लोकमत न्यूज नेटवर्क
आगर : येथून जवळच असलेल्या उगवा शिवारात बागायती क्षेत्र वाढले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी टरबूज, खरबूज व भाजीपालावर्गीय पिकांची लागवड केली आहे; मात्र शिवारातील कृषिपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
पाण्याची मुबलक सोय असल्याने उगवा परिसरातील शेतकरी बागायती शेतीकडे वळले आहेत. सद्यस्थितीत शिवारात खरबूज, टरबूज व भाजीपालावर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. सध्या पिके बहरलेली असताना पिके तोडणीला आली आहेत. त्यामुळे पिकांना पाण्याची आवश्यकता आहे; मात्र महावितरणच्या दुर्लक्षामुळे शिवारातील कृषिपंपांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढला आहे. पाण्याअभावी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. गत तीन महिन्यांत सहा ते सातवेळा वीजपुरवठा खंडित झाला आहे. महावितरणच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. महावितरणने हे नुकसान भरून द्यावे व यासाठी जबाबदार कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी शांताबाई वानखडे, रमेश पारस्कर, विजय देशमुख, महादेवराव निकामे, अशोक पारधी यांनी निवेदनातून केली आहे.
--------------------------------------------------------------------
मागील आठवड्यात तांत्रिक बिघाडामुळे उगवा येथील कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. एक-दोन दिवसात वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
- अजय भोकरे, शाखा अभियंता, उपकेंद्र, महावितरण, गांधीग्राम/ उगवा.