- संतोष गव्हाळेहातरुण (जि. अकोला ): दमदार पावसाने हातरुण परिसरातील मोर्णा नदी, कोळसा नाल्यांना गुरुवारी पूर आला. यामुळे नदीकाठावरील १२५ हेकटर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा बिकट प्रश्न उभा ठाकला आहे. शेतकऱ्यांचे हिरवे शिवार पूर्णत: मातीमोल झाले आहे. संततधार पावसाने हातरुण, दुधाळा, बोरगाव वैराळे, शिंगोली, मालवाडा, लोणाग्रा परिसरात अचानक नदी, नाल्याला पूर आला. या पूरामुळे नदी, नाल्याच्या काठावरील शेतपिकांना चांगलाच फटका बसला. बुधवारी झालेल्या पावसामुळे सकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले.पूर्णा नदीच्या पुराचे पाणी पिकाच्यावरून वाहत होते. या पुराने शेती अक्षरश: खरडून गेली. यासोबत मुंग, उडीद, सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर पिके पाण्याखाली येऊन भूईसपाट झाली. शेतकऱ्यांनी नुकतीच कपाशी, सोयाबिन लागवड करुन खत देऊन पिकांची जोपासना केली होती. कसेबसे पीक वाढून डवरीणवर आले असताना पुरामुळे क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. नदीकाठावरील शेतात मोठ्या प्रमाणात मातीचा गाळ साचल्याने पिक दिसेनासे झाले आहे. नदी,नाल्याच्या काठावर असणाऱ्या हातरुण, अंदूरा भाग एक, दुधाळा, शिंगोली, मालवाडा, अंदूरा भाग दोन शेतशिवारातील शेकडो हेक्टर शेतीला पुराचा जबरदस्त तडाखा बसल्याने पिकेच पूर्णत: भूईसपाट झाली आहेत. शेतकºयांनी पै पै गोळा करुन पिकांची लागवड केली होती. मात्र निसर्गाचा प्रकोप आल्याने शेकडो हेक्टर शेतीचे होत्याचे नव्हते झाले. यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. नदी, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने शेतकऱ्यांनी शेतात ठेवलेली शेती उपयोगी सर्वच साहित्य पुरात वाहून गेले आहे.
गावाचा संपर्क तुटला !
हातरुण येथील मोर्णा नदीच्या पुलावरून ४ फूट पाणी वाहत असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पुराचे पाणी वाढत असल्याने दुधाळा आणि बोरगाव वैराळे गावाचा संपर्क तुटला आहे.
मंदिरात नागरिकांचा मुक्काम!
मोर्णा नदीला अचानक गुरुवारी पूर आल्याने कामानिमित्त दुधाळा आणि बोरगाव वैराळे येथील नागरिक हातरुण येथील सोपीनाथ महाराज मंदिर येथे थांबलेले होते.
संततधार पावसाने क्षणार्थात शेकडो हेक्टर शेतातील पिके उद्ध्वस्त केली. त्यामुळे शेतकरी आर्थिक़ संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार आहे. या नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ महसूल विभागाने पंचनामे करणे गरजेचे आहे. - नारायणराव गव्हाणकर , माजी आमदार, बाळापूर