अकोट नगरपरिषद सभागृहात सोमवारी सकाळी प्रशासनाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीसह पालिका परिसरातील रेकॉर्ड ब्रेक गर्दी दिसून आली. एकीकडे शहरात कडेकोट बंद असताना, पालिका प्रशासनाकडून नियमांची उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे.
बैठकीला झालेली राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची गर्दी पाहता, हा राजकीय पक्षाचा मेळावा की प्रशासनाचा आढावा, हेच कळत नव्हते. अकोट उपविभागातील कोरोना महामारी संदर्भात माहिती घेणे, सूचना देण्यासाठी आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक अकोट नगरपरिषद मध्ये १० मे रोजी घेतली. बैठकीमध्ये सर्व अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. कंन्टेन्मेट झोन व इतर समन्वय नसल्याने अधिकारी व कर्मचारी समाधानकारक काम करत असल्याबद्दल बैठकीमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. अकोट-तेल्हारा येथील सर्वच महत्त्वाचे विभागाचे अधिकारी, कर्मचारी आले होते. अकोट उपविभागातील शासकीय यंत्रणाच्या आढावा बैठकीला नगराध्यक्ष, उपविभागीय अधिकारी श्रीकांत देशपांडे, तहसीलदार, मुख्याधिकारी, पोलीस अधिकारी व आरोग्य विभागाचे अधिकारी हजर होते, तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
फोटो:
बैठक नव्हे, राजकीय मेळावा
विशेष म्हणजे, या बैठकीत व नगरपरिषद परिसरात राजकीय पक्षाचे जिल्हा पातळीवरील आजी-माजी पदाधिकारी, स्थानिक तालुका व शहरातील पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच इतर राजकीय पक्षाचे कार्यकर्ते रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती. त्यामुळे नगरपरिषदेमध्ये राजकीय पक्षांचा मेळावा की प्रशासनाचा आढावा, हे उमगेना. जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. शासनाचे नियमाचे उल्लंघन
होऊ नये, याकरिता आदेश पारीत केले, परंतु आढावा बैठकीतच नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.
ऑनलाइन बैठक का नाही घेतली.
अकोट नगरपरिषद कार्यालयात राजकीय पक्षांच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची झालेली गर्दी ही कोरोना संसर्ग वाढीसाठी होती का, असा प्रश्न निर्माण होत आहे. केंद्र व राज्य शासन ऑनलाइन सभा, बैठकी घेत असताना, अकोट नगरपरिषद कार्यालयात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष बैठक आयोजित करण्यात आल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. राजकीय मेळावा असल्याचे चित्र पाहून अधिकारी-कर्मचारी हतबल दिसत होते, परंतु या बैठकीतून नेमके साधायचे होते आणि यातून आता काय साध्य होणार आहे. असे प्रश्न उपस्थित होत आहेत.