जमाव बंदीची अंमलबजावणी सुरू झाली असताना, अकोला शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मंगळवारी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. बसमध्ये चढण्यासाठी प्रवासी गर्दी करीत असल्याने, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे दिसून आले. तसेच बहुतांश प्रवाशांकडून मास्कचा वापर करण्यात येत नसल्याचे आढळून आले. त्यामुळे बसस्थानकावर कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे.
बाजारात जमाव बंदीचा बोजवारा!
शहरातील जनता भाजी बाजार परिसरात नागरिकांची होणारी गर्दी कायम असून, बाजारातील दुकाने आणि पथविक्रेत्यांकडे होणाऱ्या गर्दीत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात येत नाही. तसेच बहुतांश नागरिकांकडून मास्कचा वापर होत नसल्याने बाजारात जमाव बंदीचा बोजवारा उडत असल्याचे वास्तव आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय
परिसरातही नियमांचे उल्लंघन
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्ह्यात जमाव बंदी लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी कायम असून, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. तसेच नागरिकांकडून मास्कचा वापर करण्यात येत नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे वास्तव समोर आले.
पानठेले, चहाटपऱ्यांसमोरील
गर्दी थांबेना!
शहरातील विविध ठिकाणांसह जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती आदी शासकीय कार्यालयांच्या परिसरातील पानठेले व चहाटपऱ्यांसमोर नागरिकांची होणारी गर्दी जमाव बंदीतही थांबली नाही. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन आणि मास्कचा वापरही या ठिकणी होत नसल्याने कोरोना संसर्ग नियंत्रणाच्या उपाययोजनांचा फज्जा उडत आहे.