अकोला : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण आणि कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांतर्गत जिल्ह्यातील पंचायत समितीस्तरावर लाभार्थींकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. अर्ज सादर करण्यासाठी शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी शेवटचा दिवस असल्याने, अकोला पंचायत समितीमध्ये गुरुवारी अर्ज सादर सादर करण्यासाठी लाभार्थींची गर्दी उसळली होती.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण आणि महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांसाठी जिल्ह्यातील सातही पंचायत समिती स्तरावर २५ सप्टेंबरपर्यंत लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. अर्ज स्वीकारण्याची मुदत संपुष्टात येण्यास एक दिवसाचा कालावधी उरला असल्याने २४ सप्टेंबर रोजी अकोला पंचायत समितीमध्ये योजनांच्या लाभासाठी अर्ज सादर करण्याकरिता लाभार्थींची प्रचंड गर्दी झाली होती. अकोला पंचायत समितीमध्ये लाभार्थींचे अर्ज स्वीकारण्यासाठी चार ठिकाणी व्यवस्था करण्यात आली असली तरी अर्ज सादर करणाऱ्या लाभार्थींची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती.‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा!जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यासाठी मास्कचा वापर आणि ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून वारंवार करण्यात येत आहे; परंतु योजनांच्या लाभासाठी अर्ज सादर करण्याकरिता २४ सप्टेंबर रोजी अकोला पंचायत समितीमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते.