अकोला: जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज सादर करण्याकरिता विद्यार्थ्यांसह ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात गर्दी हाेत आहे. त्यामध्ये मास्कचा वापर आणि ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन होत नसल्याने कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
इयत्ता बारावीसह उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियासाठी आवश्यक असलेले जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी तसेच जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरक्षित जागांवर निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांकडून जात पडताळणीसाठी सामाजिक न्याय विभागांतर्गत जिल्हा जात पडताळणी समितीच्या कार्यालयात अर्ज सादर करण्यात येत आहेत. जात पडताळणीसाठी अर्ज सादर करणाऱ्याठी विद्यार्थ्यांसह उमेदवारांच्या जिल्हा जात पडताळणी समितीच्या कार्यालयात रांगा लागत आहेत. जात पडताळणीसाठी अर्ज सादर करण्याकरिता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात प्रचंड गर्दी होत आहे. त्यामध्ये मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्सिंग यासंदर्भात पालन करण्यात येत नाही. विद्यार्थ्यांकडून या नियमांचे पालन होत असले तरी, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करणाऱ्या बहुतांश उमेदवारांकडून नियमांचे पालन होत नाही. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे.
विद्यार्थी
शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेसाठीआवश्यक असलेले जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दररोज जिल्ह्यातील १०० ते १२५ विद्यार्थ्यांकडून जिल्हा जात पडताळणी समितीकडे अर्ज प्राप्त होत आहेत. त्यामध्ये इयत्ता बारावी,बीएड, एबीए, एलएलबी, सीइटी, अभियांत्रिकी आदी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
उमेदवार
जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत आरक्षित जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर करण्यात येत आहेत. दररोज ३५० ते ३७५ उमेदवारांकडून जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज प्राप्त होत आहेत.
रोज ६०० अर्ज
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी उमेदवारांकडून दररोज ३७५ अर्ज तसेच विद्यार्थ्यांकडून १२५ अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्राप्त होत आहेत. विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार जिल्हा जात पडताळणी समितीकडून दररोज ५० जात वैधता पडताळणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहे.
प्रशासनातर्फे दक्षता
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जात वैधता पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याकरिता जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात उमेदवारांची गर्दी होत आहे. त्यानुषंगाने कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणासाठी जिल्हा जात पडताळणी समिती प्रशासनातर्फे दक्षता घेण्यात आली आहे. नागरिकांनी मास्क, रुमालचा वापर करण्यासह ‘फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासंदर्भात वारंवार सूचना देण्यात येत आहेत. तसेच कार्यालय परिसरात सॅनिटाझर उपलब्ध करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करण्याकरिता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात उमेदवारांची गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासंदर्भात वारंवार सूचना देण्यात येत आहेत.
पियूष चव्हाण
सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी, जिल्हा जात पडताळणी समिती