- अतुल जयस्वाल
अकोला : राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) कर्मचारी शासकीय सेवेत विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी गत तीन महिन्यांपासून संपावर असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. कारवाईच्या बडग्यानंतर काही कर्मचारी कामावर रुजू होत असल्याने जिल्ह्यातील सर्वच आगारांमधून बस सुरू करण्यात आल्या आहेत. परिणामी बसस्थानकांवरही गर्दी वाढू लागली आहे; परंतु त्या प्रमाणात बस रस्त्यावर नसल्याने प्रवाशांना त्रास होत आहे.
जिल्ह्यात संपावर असलेले काही कर्मचारी कामावर रुजू झाले असले तरी बहुतांश कर्मचारी अजूनही संपात सहभागी आहेत. तोकड्या मनुष्यबळावर प्रवासी वाहतूक सेवा सुरळीत करण्याचा महामंडळाचा प्रयत्न आहे.
जिल्ह्यातील पाच आगारांमध्ये एकूण १८१ बस आहेत. यापैकी सध्या केवळ ३६ बस रस्त्यावर धावत आहेत. अकोला व अकोट आगारातून सर्वाधिक १३-१३ बस प्रवाशांना वाहतूक सेवा देत आहेत. अकोट आगाराच्या सहा बस अकोलासाठी १२ फेऱ्या करीत आहेत. अकोला आगार क्र. १ मधून सहा बस रस्त्यावर धावत आहेत. यापैकी परतवाडा व खामगाव बसना प्रतिसाद मिळत आहे. तेल्हारा व मूर्तिजापूर आगारातून अनुक्रमे एक व चार बस रस्त्यावर धावत आहेत.
जिल्ह्यात किती धावत आहेत बस?
साधी बस - ३७
हिरकणी - ००
शिवशाही - ००
स्लीपर - ००
एकूण - ३७
आगार - एकूण बसेस - सध्या धावत असलेल्या बस
अकोला क्र. १ - ४० - ६
अकोला क्र. २ - ४९ - १३
अकोट - ४५ - १३
तेल्हारा - २८ - १
मूर्तिजापूर - १९ - ४
अकोला स्थानकावरून अमरावती, बुलडाणासाठी बस
अकोला आगार क्र. २ च्या १३ बस अमरावती, बुलडाणा व मलकापूर या मार्गावर धावत आहेत. याशिवाय अकोट, मूर्तिजापूर, मंगरुळपीर, वाशिम, औरंगाबाद, जालना, अंबड या आगरांच्या बस मध्यवर्ती बसस्थानकावर येत आहेत. दररोज एकूण ८० फेऱ्या होत आहेत. आगाराच्या बस दररोज २५०० किलोमीटर धावत असून, १ लाख २५ हजारांपर्यंत उत्पन्न होत आहे.
प्रवाशांचा वैताग
अजूनही पुरेशा गाड्या नसल्याने बसस्थानकावर तासन् तास ताटकळत बसावे लागत आहे. ट्रॅव्हल्सने जायचे म्हटले तर अधिक तिकिट मोजावे लागते. ग्रामीण भागात जाण्यासाठी बसेस सुरू झाल्या पाहिजे.
- दत्ता काळमेघ, प्रवासी
केवळ मोठ्या शहरांमध्येच जाण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातील लोकांना अजूनही खासगी वाहतुकीवरच अवलंबून राहावे लागत आहे. संपावर तोडगा काढून बससेवा सुरू व्हायला हवी.
- विनायक देशमुख, प्रवासी
दहा टक्के फेऱ्या पूर्ववत
अजूनही बहुतांश कर्मचारी संपावर आहेत. उपलब्ध मनुष्यबळानुसार बसफेऱ्यांचे नियोजन केले जात आहे. अकोला मध्यवर्ती बसस्थानकावरून अनेक गाड्या सुरू झाल्या असून, दहा टक्के फेऱ्या पूर्ववत झाल्या आहेत, असे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.