अकोला : विदर्भात सुगंधी औषधी वनस्पतीच्या व्यावसायिक शेतीवर भर देण्यात येत असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या नागार्जुन औषधी वनस्पती उद्यानात दुर्मीळ होत चाललेल्या शेकडो वनौषधी वनस्पतींचे जतन करण्यात आले आहे. या वनौषधीची शेतावर लागवड करण्यासाठी शेतकर्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सन १९७६ मध्ये नागार्जुन वनौषधी उद्यानाची स्थापना करण्यात आली असून, या भागातून दुर्मीळ होत चाललेल्या ५४0 च्यावर विविध वनौषधी वनस्पतीचे या उद्यानात जतन करण्यात आले आहे. येथे विदर्भातील हवामानात येऊ शकणार्या व व्यापारीदृष्ट्या परवडणार्या वेगवेगळ्य़ा प्रकारची औषधी व सुंगधी वनस्पतीवर लागवड तंत्रज्ञानाविषयी संशोधन करण्यात येत आहे. पारंपरिक शेतीसोबतच विदर्भातील शेतकरी मसाले, सुगंधी औषधी वनस्पतीसारख्या व्यावसायिक शेतीची कास धरीत आहेत. या शेतीला व्यापक स्वरू प देण्यासाठी कृषी विद्यापीठाने मोहीम हाती घेतली असून, शेतकर्यांनी सुंगधी वनस्पतीची व्यावसायिक लागवड करावी, यासाठीचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. तिखाडी हे तेल गुणकारी असून, गुडघे, सांधेदुखीवर या तेलाचा उपयोग करण्यात येतो. याकरिता या शेतकर्यांनी तिखाडी तेलाच्या व्यावसायिक शेतीकडे वळावे, असे प्रयत्न या कृषी विद्यापीठाकडून सुरू आहेत. उद्यानात तिखाडी तेल निर्मिती प्रकल्प असून, माफक दरात तिखाडी तेलाचा गरजवंतांना पुरवठा केला जात आहे. नागार्जुन वनस्पती उद्यानात सुगंधी औषधी वनस्पतीची रोपे ठेवण्यात आली आहेत. शेतकर्यांनी व्यावसायिक शेतीची कास धरावी यासाठी विद्यापीठ प्रयत्नरत आहे.
विदर्भात औषधी वनस्पती लागवडीवर भर!
By admin | Published: July 04, 2015 12:22 AM