नितीन गव्हाळे
अकोला: पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने रविवारी दुपारी मारलेल्या छाप्यात अंबिकापूर शेतशिवारात असलेल्या एका ढाब्याच्या परिसरात चक्क गांजाची शेती केल्याचे आढळून आले. पोलिसांनी १० गांजाची झाडे जप्त केली असून, या गांजाचे वजन १२० ग्रॅम आहे.
विशेष पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील यांना अंबिकापूर शेतशिवारात गांजाची लागवड केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने बिकापूर शेतशिवारात असलेल्या एका ढाब्याच्या परिसरात छापा घातला असता, ढाब्याजवळ त्यांना गांजाच्या १० झाडांची लागवड केल्याचे आढळून आले. पोलिसांनी मादक अंमली पदार्थ गांजाची लहान १० झाडे, ज्यांची उंची एक ते दोन फूट आहे. ज्यांचे वजन १२० ग्रॅम, किंमत पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी रोशन रामनारायण बामन(२५) बापू नगर अकोट फैल अकोला याला अटक केली. रोशन बामन याने गांजाच्या झाडांची लागवड केल्याची कबुली दिली. त्याच्याविरूद्ध बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात एनडीपीएस ॲक्ट कलम २० ब नुसार गुन्हा दाखल केला.