अकोला : कोरोना विषाणू संसर्गाचा कहर रोखण्यासाठी जिल्ह्यात बुधवारी रात्री ८ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानुसार अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता, कडक निर्बंधांचे पालन करत व्यापाऱ्यांकडून इतर दुकाने बंद ठेवण्यात आली; मात्र शहरातील बाजार परिसरासह इतर प्रमुख रस्ते व चौकांमध्ये नागरिकांची गर्दी कायम असून, संचारबंदी कागदावरच असल्याचे वास्तव गुरुवारी अकोला शहरात पाहायला मिळाले.
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग, कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या आणि कोरोनामुळे मृत्यूंची वाढती संख्या लक्षात घेता, प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनाने राज्यभरात १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून ३० एप्रिलपर्यंत ‘लाॅकडाऊन’ घाेषित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १४ एप्रिल रोजी दिला. त्या अनुषंगाने रुग्णालये, निदान केंद्रे, वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, लसीकरण, पशुवैद्यकीय सेवा, किराणा, भाजीपाला, फळांची दुकाने, दूध विक्री केंद्र, बेकरी, मिठाई व सर्वप्रकारची खाद्याची दुकाने, पेट्रोल पंप, सार्वजनिक वाहतूक सेवा, आदी अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर दुकाने संचारबंदीत बंद ठेवण्यात आली. संचारबंदीचे पालन करत अकोला शहरात व्यापाऱ्यांकडून दुकाने बंद ठेवण्यात आली. त्यामुळे नागरिकांची गर्दी काही प्रमाणात कमी झाली असली, तरी शहरातील बाजारपेठ आणि प्रमुख चाैकांमध्ये रस्त्यांवरील नागरिकांचा राबता मात्र कायम आहे. रस्त्यावर नागरिकांची होणारी गर्दी कायम असल्याने प्रशासनामार्फत लागू करण्यात आलेली संचारबंदी कागदावरच असल्याचे चित्र आहे.
शहरात असे आढळले वास्तव!
अकोला शहरातील जनता बाजार, न्यू क्लाॅथ मार्केट, जुना कापड बाजार, गांधी रोड, टिळक रोड, सराफा बाजार, चांदेकर चौक ते फतेह चौक आदी भागात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद होती. परंतु, रस्त्यांवर नागरिकांची गर्दी कायम असल्याचे पाहायला मिळाले.
बाहेरुन बंद; आतून सुरु!
संचारबंदी दरम्यान शहरातील काही भागात जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा वगळता इतर काही दुकानांचे अर्धे शटर बंद व अर्धे शटर उघडण्यात आले होते. त्यामुळे शहरात काही दुकाने बाहेरुन बंद दिसत असली, तरी आतून मालाची ग्राहकांना विक्री सुरु असल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर फिरणे टाळावे. अन्यथा विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, या संदर्भात पोलीस व संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत.
- जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी, अकोला.
राऊतवाडीत भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांची गर्दी
राऊतवाडी, जठार पेठ चौक, उमरी रोड, सातव चौकसह शहरातील रणपिसे नगर, जवाहर नगर चौक, गोरक्षण रोड परिसरातील इन्कमटॅक्स चौक, संत तुकाराम चौक, सिंधी कॅम्प, खदान, कौलखेड रोड, आदी ठिकाणी भाजी विक्रीसह किराणा दुकाने, हार्डवेअरची दुकाने मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून आले. संचारबंदीकडे कानाडोळा करत, नागरिक रस्त्यांवर गर्दी करत असल्याचे चित्र गुरूवारी पाहायला मिळाले.
फोटो: