अकोला: जिल्ह्यातील २१४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान प्रक्रिया पार पडली. निकाल १८ जानेवारी राेजी जाहीर झाला असून, आता सरपंच काेण हाेणार, याविषयी गावागावात चर्चेचे फड रंगत आहेत. जिल्हा प्रशासनाने आधी जाहीर केलेले सरपंचपदाचे आरक्षण रद्द करण्यात आले आहे. आता येत्या २७ जानेवारी राेजी तहसील स्तरावर व २९ जानेवारी जिल्हा स्तरावर महिला आरक्षण साेडत निघण्याची शक्यता आहे.
मुदत संपलेल्या जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचातींसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. यापैकी १० ग्रामपंचायती अविराेध झाल्याने २१४ ग्रामंपचायतींसाठी १५ जानेवारी राेजी मतदान घेण्यात आले. या मतदानाचा निकाल १८ जानेवारी राेजी जाहीर करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण पॅनल विजयी झाले आहेत, तर बहुतांश ठिकाणी सत्तेचे चित्र स्पष्ट झाले आहे.
महाआघाडी सरकारने सरपंचपदाची थेट निवड रद्द केल्याने ग्रामपंचायत सदस्यांना पुन्हा महत्व आले आहे. त्यामुळे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष सरपंच साेडतीकडे लागले आहे. सरपंचपदाचे प्रवर्गनिहाय आरक्षण हे तालुका स्तरावर, तर महिला आरक्षण जिल्हा स्तरावर काढण्यात येणार आहे. आरक्षण साेडतीनंतर सरपंचपद निवडीसाठी घडामाेडींना वेग येणार आहे. जिल्हा प्रशासनाने २७ जानेवारी राेजी तहसीलस्तरावर आणि २९ जानेवारी राेजी जिल्हास्तरावर महिला आरक्षण साेडत काढण्याचे नियाेजन केल्याची माहिती आहे. जिल्हा प्रशासनाने आरक्षण साेडतीची अधिकृत तारखेची घाेषणा केलेली नाही.
प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती
२१४
अविराेध ग्रामपंचायती
१०
एकूण सरपंचपदाची आरक्षण साेडत
२२४