अधीक्षक अभियंता व विभागप्रमुखांनी साधला संवादअकोला- महावितरणच्या अकोला येथील विद्युतभवनातील क्रीडा भवन सभागृहात आज बदली आदेश घेण्यासाठी आलेल्या २३३ जनमित्रांशी अकोला मंडळाचे अधिक्षक अभियंता व अकोला परिमंडळाच्या विविध विभागप्रमुखांनी संवाद साधला. विविध विषय, माहिती, तंत्रज्ञान तसेच ग्राहकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन त्यांना ग्राहकसेवेचे धडे देण्यात आले.नुकत्याच महावितरणच्या परिमंडलातील जनमित्रांच्या बदल्या झाल्याने इतर परिमंडलातून जवळपास २३३ तंत्रज्ञ अकोला परिमंडळामध्ये रुजू झाले. आज परिमंडळातील अकोला, वाशीम, व बुलडाणा या मंडळामध्ये नियुक्ती आदेश घेण्याकरिता आलेल्या जनमित्रांशी यावेळी सभागृहामध्ये संवाद साधून त्यांना ग्राहकसेवेचे धडे देण्यात आले.यामध्ये अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांनी जनमित्र या नावातच जनतेचे मित्र असा अर्थ आहे, जनमित्रांनी मुख्यालयी राहून ग्राहकांना तत्पर दर्जेदार व अखंडित सेवा द्यावी तसेच ग्राहकांच्या समस्या व तक्रारी तत्परतेने निवारण करावे असे आवाहन केले.उपमुख्य औधोगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे यांनी मेडिक्लेम योजना, विमा योजना, अपघात व सुरक्षा याविषयी मार्गदर्शन केले. उपविधी अधिकारी सुनील उपाध्ये यांनी विजकायदा, वीजचोरी व नुकसानभरपाई याविषयी माहिती दिली. वरिष्ठ व्यवस्थापक चंद्रकांत खाडे यांनी मानव संसाधन नियम, कामाची पद्धती, जवाबदारी व कर्मच्या-यांकडून असलेल्या अपेक्षा यावर प्रकाश टाकला. जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी मोबाईल क्रमांक नोंदणी, मोबाईल अप, गणवेशाचे महत्व, ग्राहकांशी सुसंवाद, विद्युत अपघात व सुरक्षा, महावितरणच्या विविध ग्राहकाभिमुख योजना व अंमलबजावणी याविषयी सविस्तर माहिती देऊन प्रत्येक योजना ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले. यावेळी सहायक महाव्यवस्थापक (मा.स.) शशिकांत पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप घोरुडे व उपकार्यकारी अभियंता विनोद सोनटक्के यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांनी केले.
जनमित्रांना ग्राहकसेवेचे धडे
By admin | Published: May 06, 2017 7:35 PM