वाडेगाव : बाळापूर-पातूर रस्त्याचे रुंदीकरण काम सुरू असून, यासाठी मोठमोठ्या वृक्षांची कत्तल केली जात असल्याने वृक्षप्रेमींमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
बाळापूर-पातूर मार्गाचे काम सुरू असून, या मार्गाच्या दोन्ही बाजूला शेकडो वर्षांपूर्वीची मोठमोठे वृक्ष आहेत. परंतु, मार्गाच्या रुंदीकरणासाठी या डौलदार वृक्षांची कत्तल केली जात असल्याने वृक्षप्रेमींमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. काही वृक्षप्रेमी झाडाच्या अवतीभोवती उभे राहून छायाचित्रे घेऊन आठवण म्हणून जपून ठेवत आहेत. ज्या वृक्षांची कत्तल करणे आवश्यक आहे, त्यांचीच कत्तल करून अन्य वृक्षांचे संगोपन करावे, अशी मागणी ज्ञानेश्वर सरप, रवी महल्ले, गोपाल दशमुखे, लाहोळे, आदी वृक्षप्रेमींनी केली आहे.
-----------------------------------------------
रोहनखेड परिसरातील बसफेऱ्या बंद; प्रवासी त्रस्त
खासगी प्रवासी वाहनचालकांकडून प्रवाशांची लूट: बसफेऱ्या सुरू करण्याची मागणी
रोहनखेड : अकोट तालुक्यात कोरोनाचा उद्रेक सुरू असून, दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनामार्फत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद पडल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच बसफेऱ्या बंद असल्याचा फायदा घेत खासगी प्रवासी वाहनचालक जादा भाडे वसूल करून प्रवाशांची लूट करत असल्याचे चित्र रोहनखेड परिसरात दिसून येत आहे.
अकोट तालुक्यातील ग्रामीण भागात गत १६ दिवसांपासून बससेवा बंद असल्याने प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सद्यस्थितीत लग्न समारंभामध्ये वाढ झाली असून, नातेवाईक ये-जा करत असल्याने प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बससेवा पूर्ववत करण्याची मागणी होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या बंद झाल्याने अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात सापडला आहे. याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. तसेच ग्रामीण भागात बसफेऱ्या बंद असल्याने खासगी वाहतूक वाढली आहे. बस बंद असल्याचा फायदा घेत खासगी प्रवासी वाहनचालक जादा भाडे वसूल करत असल्याने प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन बससेवा पूर्ववत करण्याची मागणी रोहनखेडवासीयांनी केली आहे.
अकोट तालुक्यातील ग्रामीण भागात खूप दिवसांपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून बससेवा बंद करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील बससेवा लवकरच पूर्ववत सुरू करू.
- भालतिलक, आगार व्यवस्थापक, अकोट.