खेट्री : पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी एकीकडे शासन वृक्ष लागवडीच्या विविध योजना राबवून कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. दुसरीकडे वन व महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे भरदिवसा हिरव्या वृक्षांची कत्तल केली जात असल्याचे चित्र आहे. आलेगाव वन परिक्षेत्रातील शिरपूर परिसरात अवैध वृक्षतोड वाढली आहे. याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यातील शिरपूर व बुलडाणा जिल्ह्यातील शहापूर गावाच्या मध्यभागातून मन नदी वाहते. आलेगाव वन परिक्षेत्रअंतर्गत शिरपूर परिसरातील मन नदीच्या काठावरील शेतशिवरात लिंबाच्या झाडांची कत्तल करून अवैध वाहतूक करण्यात येत आहे. शिरपूर परिसरातील मन नदीच्या काठावर असलेल्या शेतशिवारात भरदिवसा खुलेआम वृक्षतोड करून अवैध वाहतूक होत आहे. त्यामुळे वन व महसूल विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वृक्षतोड माफिया सकाळीच मशिनद्वारे मोठ्या वृक्षांची कत्तल करून विल्हेवाट लावली जात आहे. वृक्षतोडीची माहिती परिसरातील ग्रामस्थांकडून वन व महसूल विभागाला दिली जाते, परंतु संबंधितांकडून दखल घेतली जात नाही. वृक्षतोड थांबविण्यासाठी वन व महसूल विभागाच्या वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी वृक्षप्रेमींकडून होत आहे. (फोटो) आहेत दोन
---------------------------
निंबाच्या शेकडो झाडांची कत्तल करून वाहतूक
बुलडाणा, अकोला जिल्ह्याच्या सीमेवरून वाहत असलेल्या मन नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यानजीक निंबाच्या झाडांची मशीनद्वारे कत्तल करून वाहतूक करण्यात येत आहे. याकडे संबंधित वरिष्ठांनी दखल घेणे गरजेचे आहे.
-----------------------------
ज्या परिसरात वृक्षतोड करून अवैध वाहतूक होत आहे. त्या परिसरात कारवाई करण्यासाठी कर्मचारी पाठविण्यात येईल, वृक्षतोड करताना किंवा वृक्षाची वाहतूक करताना आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल.
-सतीश नालींदे, वन परिक्षेत्र अधिकारी, आलेगाव.