अकोला: माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून होणारी फसवणूक, देवी-देवता, महापुरुषांची माहिती टाकून विटंबना करण्याचा प्रयत्न, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अनेकदा व्हॉट्स अँप, फेसबुकच्या माध्यमातून होतात. याचा तपास करण्यासाठी शासनाने प्रत्येक जिल्हा सायबर लॅब, तंत्रज्ञानयुक्त गुन्हे अन्वेषण केंद्र सुरू केले. शासनाच्या अधिसूचनेद्वारे आता सायबर लॅबला स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी दिली. नेट बँकिंग करणार्या लोकांची अकाउंट हॅक करून फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर करून तरुणींची आक्षेपार्ह छायाचित्रे, मजकूर टाकून बदनामी करण्याचे प्रकारही वाढले आहेत. तसेच फेसबुक, व्हॉट्स अँपच्या माध्यमातूनही देवी-देवता, महापुरुषांविषयी आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात येऊन धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केल्याचा तक्रारीसुद्धा नेहमीच घडतात. याला आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्हय़ात सायबर लॅब, तंत्रज्ञानयुक्त गुन्हे अन्वेषण केंद्र सुरू केले. या ठिकाणी पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकारी, पोलीस कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली; परंतु ही सायबर लॅब पोलीस अधीक्षकांच्या नियंत्रणाखाली काम करायची; परंतु सायबर क्राइमच्या वाढत्या घटना पाहता शासनाने सायबर लॅब, तंत्रज्ञानयुक्त गुन्हे अन्वेषण केंद्राला सायबर पोलीस ठाणे म्हणून घोषित केले आहे. यामध्ये अकोला तंत्रज्ञानयुक्त गुन्हे अन्वेषण केंद्राचा समावेश असून, आता अकोला सायबर पोलीस ठाणे म्हणून केंद्राला ओळख मिळणार आहे.
सायबर लॅबला पोलीस ठाण्याचा दर्जा!
By admin | Published: May 06, 2017 2:49 AM