अकोला : काही महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गॅसच्या किमती एकीकडे हजाराच्या घरात गेल्या असताना घरपोच डिलिव्हरीसाठी पुन्हा अतिरिक्त पैसे घेण्यात येत आहे. याची कुठलीही पावती दिली जात नाही. त्यामुळे घरपोचसाठी ही वेगळी लूट कशासाठी, असा प्रश्न नागरिकांकडून विचारल्या जात आहे.
आधीच डिझेल, पेट्रोलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या नाकीनऊ आल्या असताना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. महिनाभराआधी गॅस सिलिंडर २५ रुपये ५० पैशांनी महागले होते. आता पुन्हा सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. हे सिलिंडर ९०५ रुपयांना मिळत आहे. त्यामुळे एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात होणारी वाढ सर्वसामान्यांना आर्थिक ताण देणारी ठरत आहे. त्यात घरपोचसाठी वेगळे पैसे द्यावे लागत असल्याने आणखी आर्थिक भार वाढत आहे.
सध्याचा गॅस दर ९०५
एकूण उज्वला ग्राहक १,२६,०००
वर्षभरात २०० रुपयांची वाढ
एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात होणारी वाढ सर्वसामान्यांना आर्थिक ताण देणारी ठरत आहे. मागील वर्षभरात घरगुती सिलिंडरच्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली आहे. सोबतच व्यावसायिक सिलिंडरचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
डिलिव्हरी बॉयला वेगळे २० रुपये कशासाठी?
मागील आठ महिन्याच्या काळात सिलिंडरच्या दरात १५० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे आर्थिक भार वाढला असून, डिलिव्हरी बॉयला वेगळे २० रुपये द्यावे लागत आहे.
- गीता देशमुख, गृहिणी
प्रत्येक वेळेला सिलिंडरवर २०-२५ रुपये अधिक द्यावे लागतात. घरपोचसाठी वेगळे पैसे घेणे अपेक्षित नाही. आधीच आर्थिक भुर्दंड वाढत असताना हे वेगळे पैसे घेणे बंद करावे.
- भावना ताले, गृहिणी
वितरक काय म्हणतात?
गॅस वितरकांनी पेट्रोलियम मंत्रालय व नैसर्गिक गॅस यांनी वेळोवेळी घोषित होणाऱ्या रिटेल सेल प्राइस प्रमाणेच गॅस सिलिंडरची विक्री करणे बंधनकारक आहे.
- राजू देशमुख
घरपोच सिलिंडरच्या मागे कुठलेही वेगळे चार्जेस घेण्यात येत नाही. काही वितरकाकडून घेण्यात येत असतील तर याबाबत माहिती नाही.
- किशोर गवई