सचिन राऊत / अकोलाअख्ख्या महाराष्ट्रात सट्टा किंग म्हणून कुख्यात असलेला व डब्बा ट्रेडिंगमधील माफिया अशी पोलीस अधीक्षकांच्या कारवाईनंतर पोलीस दप्तरी नोंद झालेला नरेश भुतडा व दिनेश भुतडा आंध्र प्रदेशातील बालाजीच्या चरणाशी शरण गेल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. अकोला पोलिसांचे एक विशेष पथक भुतडा बंधूच्या मागावरच असून त्यांना लवकरच बेड्या ठोकण्यात येणार आहेत.इंडियन प्रीमियर लीगमधील क्रिकेटच्या सामन्यांवर मोठय़ा प्रमाणात सट्टा देवाण-घेवाण सुरू असताना पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या विशेष पथकाने आकोटमध्ये छापा टाकून नरेश भुतडासह चार जणांना अटक केली होती. त्यानंतर सट्टा किंग नरेश भुतडा आणि दिनेश भुतडा बंधूंनी श्री मार्केटमधील कस्तुरी कमोडीटीजच्या माध्यमातून अनधिकृत असलेल्या सौदा सॉफ्टवेअरच्या आधारे समांतर शेअर मार्केट (डब्बा ट्रेडिंग) या बेकायदेशीर शेअर बाजाराचा पर्दाफाश केला. शासनाची कोट्यवधी रुपयांच्या कराची चोरी करून सुरू असलेल्या डब्बा ट्रेडिंगचा अवैध शेअर बाजाराचा पर्दाफाश होताच नरेश लक्ष्मीनारायण भुतडा व दिनेश लक्ष्मीनारायण भुतडा हे दोघे फरार झाले असून ते आंध्र प्रदेशातील श्रीमंत देव म्हणून ओळख असलेल्या बालाजीच्या चरणाशी गेल्याची माहिती आहे. पोलीस अधीक्षकांचे पथकही त्यांच्या मागावर असून हे दोघे लवकरच जाळय़ात अडकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, या प्रकरणातील पोलीस कोठडीत असलेल्या दीपक महादेव राऊत, प्रशांत लाडोळे, संतोष भारसाकळे, रवींद्र भेंडारकर, गजानन मुराळे, राष्ट्रपाल भिसे, राजेश चंदन, संदीप वर्मा, उमाकांत मिश्रा यंची कसून चौकशी करण्यात येत आहे. या नऊ आरोपींच्या माध्यमातूनच भुतडा बंधू आंध्रप्रदेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर सदर पथक त्यांच्या शोधासाठी पाठविण्यात आले आहे.
‘डब्बा’ माफिया भुतडा बंधू ‘बालाजी’ला शरण
By admin | Published: June 04, 2016 2:13 AM