लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वाशिम जिल्ह्यातील कुप्रसिद्ध असलेल्या दरोडेखोरांच्या मोठ्या टोळीला विशेष पथकाने जेरबंद केल्यानंतर या टोळीला खदान पोलिसांनी ताब्यात घेऊन सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता, या टोळीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.वाशिम जिल्ह्यातील काटा येथील रहिवासी दीपक रजन बनसोड (२७), भटमुरा येथील रहिवासी संतोष विठ्ठल काळे (२२), रिसोड येथील दगडू शिवराम गायकवाड (५३), रिसोड तालुक्यातील देगाव येथील रहिवासी शिवाजी गणपत भुटेकर (३२) आणि वाशिम शहरातील विठ्ठल गणपत दळवी (२५) या पाचही गुन्हेगारांवर वाशिम जिल्ह्यातील बहुतांश पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, अकोल्यातही त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. या पाच दरोडेखोरांची टोळी शनिवारी खडकी परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी पाळत ठेवून या पाचही दरोडेखोरांना रंगेहात अटक केली. त्यानंतर सदर टोळीला खदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले यांनी त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. या टोळीतील दरोडेखोरांवर खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत का, याचा शोध घेण्यात येत आहे.दरम्यान या पाचही दरोडेखोरांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे व त्यांच्या पथकाने केल्यानंतर सदर टोळी खदान पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणाचा तपास खदानचे ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गायकी करीत आहेत.वाशिम पोलीस घेणार ताब्यातपाचही दरोडेखोरांची दोन दिवसांनी पोलीस कोठडी संपल्यानंतर वाशिम पोलीस या टोळीला ताब्यात घेणार आहेत. त्यासाठी वाशिम पोलिसांनी हालचाली सुरू केल्या असून, या गुन्हेगारांवर असलेल्या गुन्ह्यांची यादीच वाशिम पोलिसांनी तयार केल्याची माहिती आहे.