तालुक्यातील पेरणीच्या दिवसांत शेतकऱ्यांना महाबीज सोयाबीन बियाणे लागल्यास इतर बियाणे घेतल्याशिवाय महाबीज सोयाबीन बियाणे मिळणार नाही, अशा तक्रारी मिळताच कृषी विभागाच्या तालुका भरारी पथकाने सापळा रचून तेल्हारा येथील दधिमती कृषी सेवा केंद्र दुकानावर धाड टाकून कारवाई केली होती व दुकान तपासणी केली होती. त्यामध्ये शेतकऱ्यास बिल न देणे, कापूस बियाणे तीस मे पूर्वी विकणे, साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, अशा त्रुटी आढळल्या होत्या. त्रुटींची पूर्तता करण्याबाबत आदेश देऊनही पूर्तता करण्यात आली नाही व कुठलेही उत्तर दिले नाही. अशा प्रकारच्या वाढत्या तक्रारींमुळे तालुका कृषी अधिकारी तेल्हारा यांनी कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे पाठविला होता. त्यावर परवाना अधिकाऱ्यांनी कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द केला. त्या निर्णयाच्या विरोधात कृषी सेवा केंद्रधारकाने विभागीय कृषी सहसंचालक अमरावती यांच्याकडे अपील दाखल केले होते.
तेल्हारा तालुक्यात नियमांचे उल्लंघन करून कृषी निविष्ठांची विक्री केल्यास कृषी विभागाकडून कडक कारवाई करण्यात येईल.
-मिलिंद वानखेडे, तालुका कृषी अधिकारी, तेल्हारा