अकाेला : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ११ अडत कंपन्यांच्या संचालकांना सुमारे एक काेटी ८७ लाख रुपयांचा गंडा घातल्यानंतर गुन्हे दाखल हाेताच पाेलिसांनी शिवकुमार रुहाटीया व शेख जावेद शेख हुसेन कादरी या दाेघांना ताब्यात घेतले़ शिवकुमार रुहाटीया यास वैद्यकीय महाविद्यालयातील वाॅर्ड क्रमांक ६ येथे दाखल केल्यानंतर ताे तेथून खासगी रुग्णालयात हलविण्याचे बनावट कागदपत्र तयार करून पसार झाला असून यामागे वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा हात असल्याने या प्रकरणाची सखाेल चाैकशी करून दाेषींवर कारवाईची मागणी ११ अडत्यांनी वैद्यकीय अधिष्ठाता डाॅ़ मीनाक्षी गजभिये यांच्याकडे साेमवारी दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
नर्मदा साॅल्वेक्स कंपनीचा संचालक शिवकुमार रुहाटीया व त्याने अधिकृत नियुक्त केलेल्या लक्ष्मी सेल्स काॅर्पाेरेशनचा संचालक शेख जावेद शेख हुसेन कादरी या दाेघांनी अकाेला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अरिहंत ट्रेडिंग कंपनी, अजय ट्रेडर्स, सत्यजीत ट्रेडिंग, आशिीवाद ट्रेडिंग, राेशन ट्रेडिंग, हनुमान ट्रेडिंग, मालानी ट्रेडिंग, ए़ एम़ शिंगरूप, जैन ट्रेडिंग, पुंडलिक ट्रेडर्स व मानकर ॲण्ड सन्स या ११ कंपन्यांकडून सुमारे एक काेटी ८७ लाख ७८ हजार ४९१ रुपयांचे साेयाबीन एप्रिल आणि मे महिन्यात खरेदी केले हाेते़ त्यानंतर अडत्यांनी या साेयाबीन विक्रीचे देयक या दाेन्ही कंपन्यांकडे सादर केल्यानंतर दाेन्ही कंपन्यांच्या संचालकांनी त्यांना देयकाची रक्कम देण्यास टाळाटाळ केली़ त्यामुळे अकाेल्यातील काही व्यापारी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला़ मात्र, दाेन्ही कंपन्यांच्या संचालकांनी केवळ एक काेटी १० लाख रुपये देण्याचे कबूल केले़ मात्र, हा आकडा केवळ ६० टक्केच असल्याने मध्यस्थी झाली नाही़ त्यामुळे या अडत्यांच्या वतीने सतीश जैन यांनी रामदास पेठ पाेलीस ठाण्यात तक्रार दिली़ पाेलिसांनी गुन्हे दाखल करून दाेन्ही आराेपींना ताब्यात घेतले़ यामधील शिवकुमार रुहाटीया याची प्रकृती ठीक नसल्याने वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले़ वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने त्यास खासगीत हलविण्यासाठी कागदपत्र तयार करून दिले़ त्यानंतर आराेपी आयकाॅन हाॅस्पिल येथील २०८ क्रमांकाच्या खाेलीत असल्याचे सांगण्यात आले़ या ठिकाणी अडत्यांनी चाैकशी केली असता आराेपी दाेन्ही ठिकाणी नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला़ त्यामुळे आराेपीला पसार करणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चाैकशी करून कारवाई करण्याची मागणी अडत्यांनी केली आहे़
पाेलिसांकडूनही अडत्यांची टाळाटाळ
दरम्यान, आराेपीस पसार करणाऱ्यांचा तपास करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी अडत्यांनी सिटी काेतवाली पाेलीस ठाण्यात पाचवेळा फेऱ्या घातल्या़ मात्र, पाेलिसांनी त्यांचे निवेदन घेण्याचीही तसदी घेतली नाही़ त्यामुळे अडत्यांनी आता पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर व अमरावती परिक्षेत्राचे विशेष पाेलीस महानिरीक्षक चंद्रकिशाेर मीना यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले़
अटकपूर्व अंतरिम जामिनासाठी धावपळ
दरम्यान, या प्रकरणातील आराेपी शिवकुमार रुहाटीया याने अंतरिम अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात धाव घेतल्याची माहिती आहे़ अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी आराेपीने धावपळ सुरू केली असून अडत्यांनीही त्यास अटक करण्याची मागणी केली आहे़ या प्रकरणातील दुसरा आराेपी शेख जावेद शेख हुसेन कादरी यास ८ जुलैपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे़