दहीहांडा: अकोला तालुक्यातील दहीहांडा मोठे गाव असून, या गावाची लोकसंख्या अंदाजे जवळपास १५ हजारांच्या जवळपास आहे. ग्रामपंचायत १३ सभासदांची आहे. दहीहांडा ग्रामपंचायतचा कार्यकाळ ३१ ऑगस्टला संपला असून, दहीहांडा ग्रामपंचायतचा कारभार प्रशासक व सचिव पाहत आहेत. ग्रामपंचायतचे निवडणुकीचे दिवस जवळ येत असल्याने, इच्छुक उमेदवार आतापासून कामाला लागले आहेत.
निवडणुकीत पॅनल प्रमुख पॅनलची साखळी कशी जोडता येईल व आपले पॅनल कसे विजयी करता येईल, या दृष्टीने कामाला लागले आहेत.
येणाऱ्या ८ डिसेंबरला २५५ ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण निघत असल्यामुळे त्यात अकोला तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतचा समावेश आहे. इच्छुकांमध्ये तारीख कधी जवळ येते याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दहीहांडा येथे ग्रामपंचायत निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे. गावातील राजकीय पुढाऱ्यांनी भेटी घेऊन राजकीय हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. सध्या स्थितीमध्ये दहीहांडा गावाला समस्याचे जणूकाही ग्रहणच लागल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता पाच वर्ष पदाधिकारी वाॅर्डाच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. जेव्हा निवडणुका जवळ येतात, त्यावेळेस हालचाली सुरू करतात. थातूरमातूर काम करण्यासाठी पुढे-पुढे करतात, अशी चर्चासुद्धा नागरिकांच्या तोंडातून ऐकायला मिळत आहे. यावेळेस गावातील संतापलेल्या नागरिकांकडून सरपंच पदासाठी सुशिक्षित व गावप्रेमी असणाऱ्या व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे तरच गावाचा विकास करता येईल, असे ऐकायला मिळत आहे. तसेच यावेळेस ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये बऱ्याच सदस्यांचा नवीन चेहरा समोर येणार असल्याची चर्चा आहे. गावातील राजकीय मतभेद व हेवेदावे असल्याने गावाचा विकास रखडलेला आहे. गाव विकासासाठी सर्व राजकीय पुढाऱ्यांनी एकत्रित येणे गरजेचे ठरत आहे. तसेच राजकीय पुढाऱ्यांनी वाॅर्डसाठी उमेदवारसुद्धा सुशिक्षित निवडण्याची गरज आहे.