अकोला : अकोला तालुक्यातील दहिहांडा येथील श्रीक्षेत्र रूपनाथ महाराज संस्थानमध्ये ३२१ किलोची घंटा बसविली जाणार आहे. ही घंटा आकार व वजनात भारतात दुसऱ्या क्रमांकाची असल्याचा दावा संस्थानच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला.
शासकीय विश्रामगृहात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत रूपनाथ महाराज संस्थान दहिहांडाचे गणेश पोटे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की दहिहांडा येथील रूपनाथ महाराज संस्थान हे एक अत्यंत जागृत असे देवस्थान असून अनेक उपक्रम सातत्याने आयोजित करीत असते. संस्थानच्या वतीने उत्तर प्रदेश येथील जनेश्वर येथून चांदी, जस्त, साउंड पावडर, कासे, तांबे आदी धातूंनी बनविलेली तब्बल ३२१ किलो वजनाची भव्य घंटा स्थापित करण्याचा उपक्रम साकार करण्यात येत आहे. अयोध्येत असणारी ६२१ किलो वजनाची घंटा ही भारतात प्रथम क्रमांकाची घंटा असून यानंतर रूपनाथ महाराज संस्थानची ३२१ किलोची घंटा ही राष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाची घंटा आहे, असे पाेटे यांनी सांगितले. या घंटेसाठी ३ लाख ५० हजार रुपये खर्च लागला असून या अजस्र घंटेची किमया म्हणजे या घंटेमधून ओंकार हा ध्वनी निर्माण होऊन तो तब्बल ३ किमीपर्यंत ऐकू येणार असा दावा त्यांनी केला. महाशिवरात्रीनंतर तिसऱ्या दिवशी जत्रा भरत असते. तेव्हा रूपनाथ महाराजांचा मोठा उत्सव होऊन हजारोंच्या गर्दीत भव्य मिरवणूक काढण्यात येऊन ६० पोत्यांचा भंडारा हे या यात्रेचे वैशिष्ट्य असते. मात्र या कोरोना संकटात शासनाच्या निर्देशाचे पालन करीत मर्यादित स्वरूपात वार्षिक यात्रेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या वेळी उपस्थितांना घंटेचे प्रात्यक्षिक पोटे यांनी दाखवीत जिल्ह्यातील भक्तांनी संस्थानमध्ये उपस्थित राहून या दिव्य घंटेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या वेळी आशिष मगर, प्यारेलाल जयस्वाल आदी उपस्थित होते.