अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसायाला फटका बसला असून, दुग्ध व्यवसायही डबघाईस आला आहे. शहरातील हॉटेल, माॅल बंद असल्याने दुग्ध व्यावसायिक अडचणीत सापडला आहे. तसेच ग्राहकांकडूही वसुली होत नसल्याने दुग्ध व्यावसायिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.
शेतीला जोडधंदा असावा म्हणून अनेक युवक दुग्ध व्यवसायाकडे वळले. मात्र, हा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे लॉकडाऊन अतिशय चिंताजनक परिस्थिती निर्माण करेल, असे कधी वाटले नाही. लॉकडाऊनमुळे शहरातील अनेक मॉल, हॉटेल, स्वीटचे दुकाने बंद असल्याने दुधाची पाहिजे तेवढ्या प्रमाणात विक्री होत नाही. तसेच जे ग्राहक जुळले आहेत, त्यांच्याकडून वसुलीस विलंब होत असल्याने चाऱ्याचा खर्चही महिन्याकाठी वसूल होणे कठीण झाले आहे.
लॉकडाऊनमुळे कामगार वर्ग घरीच आहे. तसेच अनेक ग्राहकांचे हॉटेल, चहाची दुकाने तसेच मालवाहू साधणे बंद असल्याने ग्राहकांकडून वसुलीस विलंब होत आहे. दुसरीकडे जनावरांची ढेप, चारा नियमित आणणे गरजेचे असते. त्यामुळे आर्थिक स्थिती खालावली आहे. शासनाकडून मदतीची आशा आहे.
-रामभाऊ घोगरे, दुग्ध व्यावसायिक, टाकळी खुरेशी.
लॉकडाऊनचा फटका सर्वच व्यवसायांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे दूध विक्रीवर परिणाम झाला असून, दुसरीकडे जनावरांचा चारा, तसेच शेती उपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन मदत करावी.
- गुलाब पागृत, दुग्ध व्यावसायिक, खरप, बु.
ढेपीचे भाव दिवसेंदिवस वाढतच आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे गुरांचे बाजार बंद असल्याने गुरांच्या किमती वाढल्या आहेत. चाऱ्याचे दरही वाढले आहेत. असे असतानाही दुधाचे दर मात्र जैसे थे असल्याने हा व्यावसाय न परवडणारा ठरत आहे. शासनाने मदत द्यावी.
-अमोल महल्ले, दुग्ध व्यावसायिक, पाचपिंपळ.
जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर
जिल्ह्यात गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत असून, पावसाळा सुरू होण्यापूर्वी कमी कमी एक महिना पुरेल इतका चारा साठवून ठेवणे गरजेचे असताना आर्थिक टंचाईमुळे ते शक्य नसल्याने पशुपालक चिंतेत आहे. यामुळे शासनाने दुग्ध व्यावसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.