अकोला : अवकाळी पावसाने शेतीच्या कामामध्ये व्यत्यय आणला. काही ठिकाणी गहू, हरभरा काढणी सुरू असून शेतमाल भिजल्याने शेतकरी हवालदिल झाला. जिल्ह्यात ४ हजार ७७० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाने प्राथमिक अहवालात सांगितले आहे. अकोट तालुक्यात सर्वाधिक ४ हजार ५० हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळाबरोबरच गारपीट झाल्याने पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या शेतात गहू, हरभरा, कांदा व तीळ ही पिके उभी आहेत. तर गहू, हरभरा या पिकासह काही ठिकाणी कांदा पिकाची काढणी सुरू आहे. बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर, अकोट तालुक्यात गहू, लिंबू, पपई, कांदा बियाणे पीक, आंबा, कांदा, हरभरा व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. काढणीस आलेला गहू, कांदा पिके जमीनदोस्त झाली. काढलेला कांदा व गहू या अचानक आलेल्या पावसामुळे भिजला. निसर्गाच्या लहरीपणाने संपूर्ण शेती पिकांचे मोठे नुकसान केले. १९ व २० मार्च रोजी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने विभागीय कृषी संचालक यांना सादर केला आहे.
तालुकानिहाय झालेले नुकसान
बार्शीटाकळी
११.८२ हेक्टर
मूर्तिजापूर
११३.१० हेक्टर
अकोट
४,०५० हेक्टर
पातूर
५९५.४२ हेक्टर
अकोला, तेल्हारा, बाळापूर तालुका निरंक
कृषी विभागाने १९ व २० मार्च रोजी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. यामध्ये अकोला, तेल्हारा, बाळापूर तालुक्यात नुकसान झाले नसल्याचे सांगितले आहे.