अकाेला : खरीप हंगाम काही दिवसांवर आहे; परंतु त्याआधीच अवकाळी पावसाचा तडाखा जिल्ह्यात बसू लागला आहे. तौक्ते वादळाचा परिणाम जिल्ह्यात दिसून येत आहे. जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसामुळे ८०५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली असून, ८२ गावांना वादळाचा फटका बसला. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांना सादर केला आहे.
कोरोनामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात भर उन्हाळ्यात वारंवार अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने उन्हाळी पिकेही हातची जात आहे. अरबी समुद्रातील तौक्ते वादळामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्याला फटका बसला आहे. रविवारी या चक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्यात दिसून आला. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण हाेते; मात्र सायंकाळी जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी काेसळल्या. ग्रामीण भागात या पावसाचा जास्त जोर दिसून आला. त्यामुळे उन्हाळी पिकांसह कांदा, फळबाग, निंबू बागांचे नुकसान झाले. अकोट तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद झाली आहे.
येथे झाले नुकसान
अकाेट तालुक्यात केळी, संत्रा, कांदा, लिंबू या ७९९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. मूर्तिजापूर तालुक्यात केळीचे १.६० हेक्टर क्षेत्रात, बार्शिटाकळी तालुक्यात पपई, लिंबू ४.४० हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले.