रविवार, १६ मे रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वाडेगाव तथा परिसरातील तामशी, चिंचोली, धाडी, बल्हाडी येथील नागरिकांच्या घरावरील टीनपत्रे उडून गेले. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे, तर शेतकऱ्यांच्या लिंबू बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. झाडांवर लागलेले लिंबू पूर्णपणे परिपक्व झालेले, तर काही प्रमाणात कच्चे असलेले लिंबू वादळी वाऱ्याने खाली पडल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यामुळे बागेतील लिंबूची झाडे उन्मळून पडली आहेत. तसेच कांदा, टोमॅटो, भुईमूग व इतर पिकांचेसुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कोरोना महामारी व लॉकडाऊनमुळे शेतकरी व नागरिक संकटांचा सामना करीत आहेत. शेतकरी हवालदिल झाला आहे . शासनाने नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
फोटो:
मागील वर्षीपासून कोविडमुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे बाजारपेठ कधी सुरू, तर कधी बंद राहात असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यात नैसर्गिक संकटे येत असल्याने शेतकरी खचून गेला आहे.
- उमेश रमेश पल्हाडे,
शेतकरी
वाडेगाव.