अकोला : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये गारपीट व जोराचा वारा सुटत असल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळीमुळे कांदा पीक खाली पडले असून गारांचा मारा झाल्याने बियाणे खराब झाले. त्यामुळे कांद्याचे उत्पादन कमी होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
---------------------------------------------------
ग्रेस गुणांपासून वंचित राहण्याची धास्ती
अकोला : शासननिर्णयानुसार खेळाडू सहावी ते बारावीपर्यंत केव्हाही जिल्हा ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळला असल्यास त्याला सवलतीचे गुण देण्यात येतात; मात्र अजूनही याबाबत हालचाली नाही. दहावी व बारावीच्या परीक्षांना कमी कालावधी असल्याने खेळाडू विद्यार्थ्यांना ग्रेस गुण न मिळण्याची भीती आहे.
-----------------------------------------------------
विनामास्क प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली
अकोला : वारंवार सूचना करूनही रेल्वे प्रवासी तोंडाला मास्क बांधत नसल्याने अकोला जंक्शनवर कोरोनाचा धोका वाढला आहे. मात्र, रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म किंवा गाडीत बसल्यावर अनेक प्रवासी तोंडावरील मास्क काढून हनुवटीवर लावतात. मास्क न वापरणारे बेफिकीर प्रवासी कोरोनाचे सुपरस्प्रेडर ठरू शकतात. त्यांच्यावर प्रशासनाने धडक कारवाई करावी, अशी मागणी आहे.
-----------------------------------------------------
एसटीच्या फेऱ्या कमी
अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रवाशी संख्या घटली आहे. त्यामुळे महामंडळाने एसटी बसच्या फेऱ्या कमी केल्या आहेत. त्याचा फटका महामंडळाला बसत असून लाखो रुपयांचे उत्पन्न कमी झाले. पुढे काही दिवस अशीच परिस्थिती राहल्यास हे नुकसान कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.