आमदार देशमुख यांनी कोरोना उपाययोजनांबाबत साई हॉलमध्ये बैठक घेतली. बैठकीला माजी आमदार एस. एन. खतिब, बाजार समितीचे सभापती सेवकराम ताथोड, नगराध्यक्ष सै. ऐनोद्दीन खतिब, प्रभारी उपविभागीय अधिकारी विश्वनाथ घुगे, तहसीलदार डी. एल. मुकुंदे, पातूरचे तहसीलदार दीपक बाजड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भावना हाडोळे, मुख्याधिकारी जी. एस. पवार, गट विकास अधिकारी शिर्के, कृषी अधिकारी दिलीप देशमुख, विस्तार अधिकारी आर. के. देशमुख, नायब तहसीलदार ए. एस. सोनुने उपस्थित होते. आमदार देशमुख यांनी बाळापूर येथे दोन्ही तालुक्यांतील अधिकाऱ्यांसोबत तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्ण, लसीकरण केंद्रांची अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. ग्रामीण भागातील बाधित रुग्णांना जिल्हा परिषद शाळेत व इतर शासकीय इमारतीत विलगीकरणात ठेवून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी. आरोग्यसेवक, आशा, वर्कर, ग्रामसेवक, तलाठी यांच्या मदतीने तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. लसीकरणाच्या बाबतीत दोन्ही तालुक्यांना लस वितरणात दुजाभाव केल्याचे सांगत, इतर तालुक्यांच्या तुलनेत लस कमी दिल्यामुळे आमदार देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. लस घेणाऱ्या नागरिकांसाठी केंद्रावर मंडप, त्यांच्या बसण्यासाठी खुर्च्या, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिले.
लसीकरणाबाबत जनजागृती करा
लसीकरण केंद्रावर गर्दी होणार नाही व लोकांना परत जाण्याचा त्रास होणार नाही याबाबत दक्ष राहणे. आरोग्य विभागाने लस घेतल्यानंतर ताप, अंगदुखणे याबाबतीत लस घेणाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात यावी. लसीकरण केंद्रावर लसीकरण व्यवस्थित सुरू आहे की नाही. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही. याची काळजी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी.
लॉकडाऊनचे पालन कटाक्षाने करावे
ग्रामपंचायतसह महसूल कर्मचारी, कोतवाल, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व पोलीस कर्मचाऱ्यांनी नियोजन करून लॉकडाऊनचे काटेकोर पालन होईल. याची दक्षता घ्यावी. आरोग्य विभागाला मदत करून जास्तीत जास्त संख्येने लसीकरण करून सहकार्य करावे. अशा सूचनाही आमदार देशमुख यांनी दिल्या.