अकोला: शासनस्तरावर शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन (विज्युक्टा)च्या वतीने १४ डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाने २ सप्टेंबर रोजी आढाव बैठकीमध्ये अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्यापही शासनाने निर्णय घेतला नाही. त्यासाठीच या धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षकांच्या ऑनलाइन संच मान्यतेतील त्रुटी त्वरित दूर कराव्या, शिक्षक-शिक्षकेतरांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, पात्र विनाअनुदानितांना त्वरित अनुदान सूत्र लागू करावे, शिक्षकांना निवड श्रेणी विनाअट सरसकट लागू करा, सुधारित वेतनश्रेणीचा लाभ जि.प. शिक्षकांना द्या, विद्यार्थी हितासाठी गणित व विज्ञानाचे दोन स्वतंत्र पेपर करा, कला व क्रीडा शिक्षकांसंदर्भातील काळा आदेश रद्द करा, स्वयं अर्थशासितच्या धोरणात बदल करावा आदी मागण्या आहेत. महासंघाचे अध्यक्ष प्रा. डी.बी. जांभरुणकर, सरचिटणीस प्रा. अनिल देशमुख, विज्युक्टाचे प्रांताध्यक्ष प्रा. डॉ. अविनाश बोर्डे, महासचिव प्रा. अशोक गव्हाणकर यांच्या नेतृत्वात हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रा. गणेश वानखडे यांनी कळविले आहे.
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी विज्युक्टाचे धरणे
By admin | Published: December 06, 2015 2:12 AM