अकोला : शहरासह जिल्ह्यात गर्दीच्या ठिकाणी तसेच शाळा, महाविद्यालय व कोणत्याही परिसरात महिला किंवा युवतीची छेडखानी होत असल्यास त्यांना तक्रार करण्यासाठी दामिनी पथकाचा एक स्वतंत्र मोबाइल क्रमांक देण्यात आला आहे. दामिनी पथकाच्या कामात गती आणण्यासाठी तसेच महिलांना तातडीने सेवा मिळावी यादृष्टीने दामिनी पथकासाठी 7447410015 हा एक स्वतंत्र मोबाइल क्रमांक कार्यान्वित करण्यात आला.पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या संकल्पनेतून महिलांना व युवतींना तक्रार करण्यासाठी स्वतंत्र मोबाइल क्रमांक असावा या उद्देशाने त्यांनी दामिनीमध्ये एक स्वतंत्र मोबाइल क्रमांक दिला आहे. या क्रमांकावर महिला व युवतींनी तक्रार केल्यास त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. तसेच ज्या ठिकाणावर छेडखानी झाली त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात येणार आहे. हा मोबाइल क्रमांक शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक महिलेने त्यांच्या मोबाइलमध्ये सेव्ह करून ठेवावा. कधीही गैरप्रकार झाल्यास तातडीने तक्रार करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केले आहे. यासोबतच या मोबाइल क्रमांकावर व्हॉट्स अॅप तक्रार केल्यासही त्यावर तातडीने कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक यांनी स्पष्ट केले आहे.
महिलांसाठी आता दामिनी पथकाचा स्वतंत्र क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2020 10:55 AM