कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी संचारबंदी जाहीर केली. त्या अनुषंगाने शनिवारी दानापूर ग्रामपंचायततर्फे लाऊडस्पीकरद्वारे गावात संचारबंदी पाळण्याचे आवाहन केले होते. संचारबंदीला गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मेडिकल, दवाखाने आदी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळला. यावेळी गावातून जाणारे संपूर्ण रस्ते ओस पडले होते. तसेच पोलीस प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्यांना समज दिली. यावेळी हिवरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार धीरज चव्हाण, पीएसआय दातीर, बीट जमादार संतोष सुरवाडे, प्रफुल्ल पवार, आकाश राठोड यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
---------------------------------
कुरणखेड येथील आठवडी बाजार कडकडीत बंद
कुरणखेड: अकोला जिल्ह्यात प्रत्येक रविवारी शनिवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.
बोरगाव मंजू पोलीस ठाण्यातंर्गत येत असलेल्या ग्राम कुरणखेड येथे दर रविवारी भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला होता. येथे आठवडी बाजार भरतो. ग्रामपंचायतने दवंडी दिल्यामुळे संचारबंदीत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुरणखेड येथे गावात एक रुग्ण आढळून आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी मास्क वापरावे तसेच कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायतने केले आहे.
----------------------------------
बोरगाव मंजू येथे कडकडीत बंद
बोरगाव मंजू : गत काही दिवसांपासून कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी शासनाने शर्थीचे प्रयत्न केल्याने रुग्णांची संख्या घटली होती. त्यामुळे अनलॉक प्रक्रियेत शाळा, महाविद्यालये सुरू करण्यात आली होती ; मात्र गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदीचा आदेश काढला. याला प्रतिसाद देत रविवारी सकाळपासून सर्व हाॅटेल, छोटी- मोठी दुकाने बंद दिसून आले. दरम्यान, जनतेने आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभाग, पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.