मनपा प्रशासनाकडून दरवर्षी मान्सूनपूर्व नालेसफाई केली जाते. गतवर्षी काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे नालेसफाई बाजूला सारली हाेती. त्यामुळे साहजिकच यंदा नाल्यांमध्ये माेठ्या प्रमाणात साचलेली घाण लक्षात घेता प्रशासनाने एप्रिल महिन्यांत नालेसफाईला प्रारंभ करणे अपेक्षित हाेते. नालेसफाईला विलंब झाला असून त्यात आयुक्त अराेरा यांनी पडीक वाॅर्ड बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अस्वच्छतेच्या समस्येत आपसूकच वाढ झाली आहे. प्रशासनाने कंत्राटी आराेग्य निरीक्षकांची सेवा बंद करीत पडीक वाॅर्डातील साफसफाईच्या कामासाठी आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. एका आराेग्य निरीक्षकाकडे संपूर्ण एका प्रभागाची जबाबदारी साेपविण्यात आली. नेमक्या या परिस्थितीचा फायदा उचलत अनेक सफाई कर्मचारी कर्तव्यापासून पळ काढत असल्याचे समाेर आले आहे. आस्थापनेवरील सफाई कर्मचारी आराेग्य निरीक्षकांना जुमानत नसल्याची परिस्थिती आहे. यासर्व बाबींचा परिपाक प्रभागांमधील दैनंदिन साफसफाईच्या कामावर हाेऊन अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे सर्वपक्षीय नगरसेवक कमालीचे वैतागले आहेत.
जनता भाजीबाजार सारला बाजूला!
जनता भाजीबाजाराच्या आरक्षित जागेवर वाणिज्य संकुल उभारण्याच्या अनुषंगाने मनपा प्रशासनाने बाजारातील दुकाने हटविण्याच्या हालचाली वाढवल्या हाेत्या. आयुक्तांनी त्यांचे सर्व लक्ष भाजीबाजारावर केंद्रित केल्याचे त्यावेळी दिसून आले. याप्रकरणी महसूल मंत्र्यांनी स्थगिती देताच आयुक्तांनी प्रभागातील स्वच्छतेच्या कामावर भर दिल्याचे दिसत आहे.
स्वच्छतेच्या कामात सुधारणा का नाही?
पडीक वाॅर्ड बंद केल्यामुळे शहरात निर्माण झालेली अस्वच्छतेची समस्या दूर करण्यासाठी आयुक्त अराेरा यांनी उपायुक्त, सहायक आयुक्तांसह मनपाची संपर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. दरराेज सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत प्रभागांमधील स्वच्छतेच्या कामाची पाहणी करण्याचे यंत्रणेला निर्देश आहेत. मागील १८ दिवसांतही स्वच्छतेच्या कामात सुधारणा का नाही, यावर प्रशासनाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे.