केंद्रीय निति आयोगाने देशात तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. त्याची सुरुवात सप्टेंबर महिन्यातच होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली असून, लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना जिल्हास्तरावर देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, जिल्ह्यातील लसीकरणाचा वेग वाढविण्याचे नियाेजन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले असून, येत्या दोन दिवसांत जिल्ह्यात लसीकरणाचे ८० सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात शहरी, ग्रामीण आणि महापालिका क्षेत्र मिळून दिवसाला ५० ते ६० सत्र राबविण्यात येत आहेत. येत्या दोन दिवसांत या सत्रात वाढ होणार आहे. त्यामुळे ज्यांनी लस घेतली नाही किंवा लसीचा दुसरा डोस घ्यायचा बाकी आहे, अशा नागरिकांनी येत्या चार ते पाच दिवसांत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत केले जात आहे.
जिल्ह्याला लसीचे २२,५०० डोस प्राप्त
जिल्ह्यासाठी गुरुवारी लसीचे २२ हजार ५०० डोस प्राप्त झाले आहेत. यामध्ये कोविशिल्डचे १९ हजार, तर कोव्हॅक्सिनच्या ३५०० डोसचा समावेश आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात लसीचा मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
या ठिकाणी राहतील लसीकरणाचे सत्र
सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र
ग्रामीण रुग्णालये
मनपा क्षेत्रातील शासकीय व खासगी केंद्र
दिवसाला १० हजार लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट
आठवडाभरात लसीच्या तुटवड्याची शक्यता
सद्य:स्थितीत कोविडची स्थिती नियंत्रणात आहे. मात्र, येत्या काही दिवसांतच कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. रुग्णसंख्या वाढू लागताच लोक लसीकरणासाठी केंद्रावर गर्दी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात जिल्ह्यात पुन्हा लसीचा तुटवडा उद्भवू शकतो.
संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील लसीकरणाचे सत्र वाढविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने नियोजन केले जात आहे. ज्या नागरिकांचा लसीचा दुसरा डोस घेणे बाकी आहे. त्यांनी प्राधान्याने लस घ्यावी.
-डॉ. मनीष शर्मा, जिल्हा समन्वयक, कोविड लसीकरण मोहीम, अकोला