- सागर कुटे
अकोला : राज्यातील काही भागात कपाशी पीक पात्यावर आले आहे. शनिवार, ७ ऑगस्ट रोजी अमावास्या आहे. या अमावास्येच्या रात्री बोंडअळ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापूस उत्पादकांना ही रात्र चिंतित करणारी ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. राज्यातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांसाठी बोंडअळी ही मारक ठरत आहे. गतवर्षी या गुलाबी बोंडअळीमुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात कापसाचे उत्पादन निम्म्यावर आले. २०१७-१८ मध्येही हीच परिस्थिती पाहावयास मिळाली होती. राज्यातील कृषी विद्यापीठ व कृषी विभागाकडून यावर वेळोवेळी उपाययोजना करण्यात येत आहे. तरीही बोंडअळीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे आढळून येत आहे. यंदाही काही जिल्ह्यात कपाशीवर गुलाबी बोंडअळी आढळून आली आहे. शनिवारचा दिवस हा आणखी धोका वाढविणारा ठरू शकतो.
अमावास्येच्या रात्री कपाशीवर हा परिणाम
अमावस्येच्या रात्रीच्या दोन दिवस अगोदर व दोन दिवस नंतर गुलाबी बोंडअळीचे पतंग कपाशीवर मोठ्या प्रमाणात अंडी घालतात. त्याचा परिणाम ५-६ दिवसांनी कापूस पिकावर दिसून येतो. यावेळी फुलाची डोमकळी म्हणजे (न उमललेली कळी) दिसू लागत असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने स्पष्ट केले.
ही अंधश्रद्धा नव्हे!
अमावास्येला कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढतो. ही निव्वळ अंधश्रद्धा नसून पतंगांनी घातलेल्या अंड्यांमधून घनदाट अंधारात बोंडअळीच्या अळ्या बाहेर पडत असल्याचे कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. शनिवारी सायंकाळपासून अमावास्या सुरू होत असल्याने पिकांची काळजी घेणे गरजेचे आहे.
कपाशीवर फवारणी करा!
बोंडअळी अंडी घालण्याआधी तीन दिवसांपर्यंत पाच टक्के निंबोळी अर्क किंवा ॲझाडीरेक्टीन ०.१५ टक्के प्रवाही (एनएसकेई बेस) २५ मि.ली. प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असल्याने बिव्हेरिया बॅसियाना ४० मि. ली. प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शेतात फेरोमन सापळे पाच प्रती एकर लावावेत व त्यावरील सूचनेनुसार विशिष्ट कालावधीत कामगंध वड्या (ल्यूर) बदलणे आवश्यक आहे. दर आठवड्याने पतंग मोजून नष्ट करावे. जर सापळ्यामध्ये प्रत्येकी आठ ते दहा नर पतंग सतत दोन-तीन दिवस आढळल्यास रासायनिक कीटकनाशकांच्या वापराद्वारे नियंत्रण करणे आवश्यक आहे.
- डॉ. उपेंद्र कुलकर्णी, कीटकशास्त्रज्ञ, कीटकशास्त्र विभाग डॉ. पंदेकृवि, अकोला