अवैध होर्डिंगमुळे शहराचे विद्रुपीकरण
अकोला: शहरातील विविध चौकात, तसेच खांबावर अवैध होर्डिंग लावण्यात आले आहेत. अनलॉक नंतर होर्डिंगचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून याकडे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे.
फुलांची मागणी वाढली
अकोला: गत वर्षभरात विविध धार्मिक उत्सव तसेच लग्न समारंभांवर निर्बंध असल्याने फुलांच्या मागणीत लक्षणीय घट झाली होती. त्याचा पटका फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता, मात्र आता लग्न सराईसोबतच इतरही कार्यक्रमांना मान्यता मिळाली आहे. त्यामुळे फुलांची मागणी वाढली आहे. परिणामी फूल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वातावरण बदलाचा हरभरा पिकाला फटका
अकोला: गत महिनाभरात जिल्ह्यातील वातावरणात होत असलेल्या बदलांचा रब्बीच्या पिकांना फटका बसत आहे. मागील दोन आठवड्यात जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते, तर सध्या अंशत: ढगाळ वातावरण आहे. बदलते वातावरण अळ्यांसाठी पोषक ठरत असल्याने शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून गरजेनुसार फवारणी करण्याचे आवाहन कृषी विद्यापीठाद्वारे करण्यात आले आहे.
खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था
अकोला: शहरातील सिमेंट काँक्रिटचे रस्ते बांधून जास्त काळ झाला नाही; मात्र या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचे दिसून येत आहेत. प्रामुख्याने दवा बाजार समोरील मार्गासह सिव्हिल लाईन चौक आणि रा.ल.तो. महाविद्यालयासमोरील मार्गावर खड्डे पडले आहेत. या ठिकाणी रस्ते बुजविण्यात आले, तरी त्या ठिकाणी पुन्हा खड्डे दिसून येत आहेत.
बाजारपेठेत गर्दी, तरी मास्क नाही
अकोला: शहरातील मुख्य बाजारपेठेत गर्दी वाढली आहे, मात्र अनेकांकडून कोविड नियमांचे पालन होताना दिसत नाही. काला चबुतरा परिसरात नेहमीच गर्दी असून या ठिकाणी व्यापाऱ्यांसोबतच नागरिकही विना मास्क संचार करताना दिसून येतात. यामुळे कोविडचा फैलाव होण्याची शक्यता असून, बेफिकीरीने वावरणाऱ्यांवर कारवाईची गरज आहे.