- संजय खांडेकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : घरात अठराविश्व दारिद्र्य, सोबतच कोणतेही शैक्षणिक वातावरण नसताना, सफाई कामगाराची सुकन्या शीतल श्याम सारसरने वाणिज्य शाखेतून ८२ टक्के गुण मिळवित उंच झेप घेतली आहे. शीतलच्या या यशाचे स्व. ज्योती जानोळकर कनिष्ठ महाविद्यालयात कौतुक होत आहे.स्थानिक खदान परिसरातील हनुमान आखाड्याजवळच्या मध्यमवर्गीय वसाहतीत राहणारी शीतल. तिचे वडील खासगी सफाई कामगार. आई आजारी असल्याने घरात अंथरूणावरच असते. घरात कुणालाच शिक्षणाचा गंध नाही. अशा विपरीत परिस्थिती शीतलने बारावीत वाणिज्य शाखेतून ८२ टक्के गुण मिळविले आहेत. शीतलचे हे यश गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणांएवढेच मोलाचे आहे. कारण तिने हे यश अत्यंत विपरीत परिस्थितीत मिळविलेले आहे. कोणत्याही शैक्षणिक सुविधा नसताना, केवळ शिक्षकांच्या मार्गदर्शनावर तिने हे यश मिळविले आहे. आई आजारी असल्याने स्वयंपाक, धुणीभांडी आदी घरातील दैनंदिन कामे आटोपून शीतल शाळेत येत असे आणि घरातील कामे आटोपून ती अभ्यास करायची. कोणत्याही शिकवणीविना तिने मिळविलेले यश हे निश्चितच साधारण नाही. चांगले गुण मिळवून आपल्या कुटुंबीयांना या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा मानस गुणवंत शीतलचा आहे. शीतल आपल्या यशाचे श्रेय संस्था सचिव प्रा. प्रशांत जानोळकर, संचालिका स्मिता जानोळकर, प्राचार्य पी. एस. लांडे आणि शिक्षक संजय देशमुख, माधुरी महाकाळ व पांडुरंग चौधरी या शिक्षकवृंदांना दिले आहे.
सफाई कामगाराच्या कन्येची यशस्वी भरारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 1:42 PM