अकोला : फाळणीनंतर जम्मू-काश्मीर सीमेवर युद्धांच्या चकमकी सुरू असत. दि.२ मे १९४८ रोजी झालेल्या युद्धात प्रथम बटालियन महार मशीनगन रेजिमेंटमध्ये सेवेत असलेले सैनिक दौलतराव जाधव यांच्या डाव्या हाताला गोळी लागल्यानंतरही जिवाची पर्वा न करता झुंज सुरूच ठेवून त्यांची मशीनगन ही पाकिस्तानी सैन्यांचा खात्मा करूनच शांत झाली.
स्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची फाळणी झाल्यानंतर जम्मू-काश्मीरच्या सीमेवर अधून-मधून भारत-पाकिस्तान सैनिकांमध्ये युद्धांच्या चकमकी होत होत्या. अशा तणावाच्या परिस्थितीवर सतत नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने भारतीय सैन्याच्या ‘प्रथम बटालियन महार मशीनगन रेजिमेंट’मध्ये सेवेत असलेले शूर सैनिक दौलतराव विठोबाजी जाधव, यांचा दि. ०४ डिसेंबर १९४७ ते ०२ मे १९४८ पर्यंतचा कालावधी हा जम्मू-काश्मीरच्या सीमारेषेच्या रणभूमीवरील प्रत्यक्ष लढाईचा होता. यादरम्यान, ०२ मे १९४८ रोजी झालेल्या युद्धात दौलतराव जाधव यांच्या डाव्या हाताला गोळी लागली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. तरीही जिवाची पर्वा न करता, त्यांनी एकाच उजव्या हाताने मशीनगन सुरू ठेवली. पाकिस्तानी सैन्यांचा खात्मा करूनच त्यांची मशीनगन शांत झाली. अनेक तास सुरू असलेल्या या धूमश्चक्रीत शूर दौलतराव जाधव यांना पुणे येथील मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ भरती केले. ते रुग्णालयातच दोन वर्षे पाच महिने मृत्यूशी झुंज देऊन बरे झाले. त्यांच्या या थराराची व पराक्रमाची प्रेरणा युवा पिढीला देण्यासाठी त्यांचे पुत्र भास्कर दौलतराव जाधव दरवर्षी सोहळ्याचे आयोजन करतात.
-------------------------------------
भारत सरकारतर्फे स्वातंत्र शौर्य पदक
शूर सैनिक दौलतराव विठोबाजी जाधव यांच्या शौर्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना ‘स्वातंत्र्य शौर्य पदक’देऊन गौरव केला आहे. त्याचा हा पराक्रम युवा पिढीला नक्कीच प्रेरणा देणारा आहे.
-------------------------