लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महिनाभर कडक उपवास (रोजा) केल्यानंतर मुस्लीम बांधवांना प्रतीक्षा असते, ती रमजान ईद सणाची. मुस्लीम बांधवांचा हा सण सोमवारी साजरा होणार असला, तरी दाउदी बोहरा समाजातील बांधवांनी रविवारीच रमजान ईद साजरी केली. दाउदी बोहरा हे इजिप्शियन कॅलेंडर मानत असल्यामुळे त्यांचे रमजान महिन्याचे ३० दिवसांचे रोजे शनिवारीच पूर्ण झाले. त्यामुळे या समाजातील लोकांनी रविवारी रमजान ईद साजरी करून अल्लाहची करुणा भाकली.रविवारी सकाळीच मोहम्मद अली मार्गावरील बदरी मशिदीत मध्य प्रदेशातील खरगोन येथील जनाब आमील साहब शेख सैफुद्दीन भानपूरवाला यांच्या नेतृत्वात विशेष नमाज अदा करण्यात आली. यावेळी त्यांनी मौला मुफद्दल सैफुद्दीन यांचा शांततेचा संदेश समाज बांधवांना दिला. याप्रसंगी शेख सैफुद्दीन बंदूकवाला, मुल्ला हाजी जैनुद्दीन भाई गंधी, शब्बीरभाई मोटरवाला, प्रा. मुल्ला इस्माइल नज्मी, मुश्ताकभाई बोरिंगवाला, मुल्ला शब्बीरभाई मामाजी, मोइजभाई बोदलजी, मोईजभाई घडीवाले, शब्बीरभाई शाहमलक आदी मान्यवरांची उपस्थिती होती. ईदनिमित्त दाउदी बोहरा समाजबांधव आपल्या पारंपरिक वेशभूषेत मशिदीत नमाज अदा करताना दिसून आले. जैनी मशीद, बतुल पार्कमध्येही विशेष नमाजवाशिम बायपासस्थित जैनी मशीद येथे शेख मोहम्मद भाई यांच्या नेतृत्वात ईदची विशेष नमाज अदा करण्यात आली. यावेळी सर्वांनी परस्परांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजान महिन्यात आपल्या गोड आवाजात अजान पठण करणाऱ्या हुसैन सैफुद्दीन वोरा यांचा सत्कार आमील साहब यांच्या हस्ते करण्यात आला.
दाउदी बोहरा बांधवांनी साजरी केली रमजान ईद
By admin | Published: June 26, 2017 9:56 AM