अकोला : फुलपाखरांच्या दुर्मीळ जाती शोधण्यासाठी अरुणाचल प्रदेशामध्ये गेलो होतो. घनदाट जंगलांमध्ये फिरत असताना, गैरसमजातून बोडो उग्रवाद्यांनी अपहरण केले आणि तब्बल ८१ दिवस डांबून ठेवले. हा जीवनातील अत्यंत थरारक अनुभव होता. बोडो उग्रवाद्यांच्या तावडीतून सुटणे कठीण होते. क्षणोक्षणी जीवाची भीती होती; परंतु गैरसमज दूर झाल्यानंतर माझी सुटका केली. या नाट्यमय प्रवासाने आणि अनुभवाने अनेक गोष्टी शिकविल्या. अशा शब्दात ‘ब्लू मोरमोन’ फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून दर्जा मिळवून देणारे राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष विलास बर्डेकर यांनी अनुभव सांगितले.पर्यावरण, वने आणि वन्य जीव संवर्धन शिक्षणाचे काम करणारी ईएफईसी आणि सृष्टी वैभवच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी ‘अद्भुत फुलपाखरे’ या चित्रकला स्पर्धेचे आयोजन आणि चित्रकला स्पर्धेच्या भित्तीपत्रकाचे विमोचन प्रमिलाताई ओक सभागृहात करण्यात आले आहे. यावेळी अध्यक्षस्थानावरून बर्डेकर बोलत होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून दादासाहेब वझे, वन विभागाचे उप वनसंरक्षक एस.बी. वळवी, सहायक वन संरक्षक लिना आडे, मिग्जचे अजय देशपांडे, राजेश जोध, रोटरी क्लब आॅफ अकोलाचे अध्यक्ष गिरीश नानोटी, ढोणे चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन बोबडे, सुवर्णा नागापुरे, प्रा. संध्या मेश्राम, प्रा. नागेश शिंदे, कलाध्यापक संघाचे विभागीय उपाध्यक्ष सुभाष धार्मिक, कलाध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष संजय आगाशे, सचिव दिनेश पाटील, रोटरी क्लब आॅफ अकोलाचे अध्यक्ष गिरीश नानोटी आदी होते. यावेळी विलास बर्डेकर यांनी भित्तीपत्रकाचे विमोचन केले. ईएफईसीचे उदय वझे यांनी अद्भुत फुलपाखरे विषयावर पॉवर पॉइंट सादर केले. विलास बर्डेकर यांचा दादासाहेब वझे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमामध्ये संजय आगाशे, सुभाष धार्मिक, प्राचार्य गजानन बोबडे यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन भारती मामनकर यांनी केले, तर आभार देवेंद्र तेलकर यांनी मानले. कार्यक्रमामध्ये विद्यार्थी, शिक्षकांना कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. (प्रतिनिधी)