अकोला: अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या कारवाईचा धसका घेतल्याने मृत्यू झालेल्या देवानंद थदानी या व्यावसायिकाचा मृतदेह संतप्त सिंधी बांधवांनी गुरुवारी महापालिकेत आणला. नियमबाह्यरीत्या अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविणार्या दोषी अधिकारी-कर्मचार्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह हलविणार नसल्याची भूमिका घेत, सिंधी बांधवांनी मनपा प्रशासनाच्या विरोधात उग्र निदर्शने केली. प्रभारी शहर पोलिस उपअधीक्षक गणेश गावडे यांनी या प्रकरणी दोषी आढळणार्या कर्मचार्यांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर व्यावसायिकांनी माघार घेतली.शहरातील अतिक्रमणाच्या मुद्यावर ठोस निर्णय घेऊन राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबविण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत. याकडे दुर्लक्ष करीत मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, उपायुक्त दयानंद चिंचोलीकर नियमबाह्यरीत्या अतिक्रमण हटाव मोहीम राबवित असल्याचा आरोप होत आहे. २९ ऑक्टोबर रोजी अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या कारवाईचा धसका घेत, टिळक रोडवर फोटो फ्रेमिंगचा व्यवसाय करणार्या देवानंद थदानी यांचा मृत्यू झाल्याने सिंधी बांधवांनी संपूर्ण बाजारपेठ बंद केली. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा विरोध दर्शवित सिंधी बांधवांनी थदानी यांचा मृतदेह महापालिकेत आणला.दोषी अधिकारी, कर्मचार्यांवर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंंत मृतदेह हलविणार नसल्याची भूमिका व्यावसायिकांनी घेत प्रशासनाच्या विरोधात उग्र नारेबाजी केली. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, भाजपचे गटनेता हरीश आलीमचंदानी, माजी महापौर मदन भरगड, नगरसेवक अजय शर्मा यांनी उपस्थित जमावाची समजूत काढली.
व्यावसायिकाचा मृतदेह मनपात
By admin | Published: October 31, 2014 1:32 AM