अकोला : जिल्ह्यात सध्या बर्ड फ्लूमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच शनिवारी शहरातील गोरक्षण रोडस्थित गोरक्षण संस्थान परिसरात मृतावस्थेत कावळे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागामार्फत मृत कावळ्यांचा पंचनामा करण्यात आला. कावळ्यांचा मृत्यू कशामुळे झाला, यासाठी मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.
बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळगाव चांभारे गावात बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर पशुसंवर्धन विभागामार्फत विशेष सतर्कता बाळगण्यात येत आहे. अशातच शनिवारी सायंकाळी गोरक्षण रोडस्थित गोरक्षण संस्थान परिसरात काही मृत कावळे आढळले. घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाचे पथक गोरक्षण संस्थान परिसरात दाखल झाले. या ठिकाणी पथकामार्फत मृत कावळ्यांचा पंचनामा करण्यात आला. प्राथमिक माहितीच्या आधारे गोरक्षण संस्थान परिसरात तीन कावळे मृतावस्थेत आढळून आले. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. पुढील तपासणीसाठी मृत कावळ्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे अहवाल येत नाही, तोपर्यंत नागरिकांनी अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले.
गोरक्षण रोडस्थित गोरक्षण संस्थान परिसरात शनिवारी सायंकाळी काही कावळे मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
- डॉ. तुषार बावणे, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग, अकोला