प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी १५ जुलैपर्यंत अंतिम मुदवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर मुदतवाढ मिळणार नसल्याने, विहित मुदतीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होऊन पिकांचा विमा तातडीने काढावा, असे आवाहन करण्यात आले आहे. भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही पीक विमा योजनेत सहभाग घेता येणार आहे. कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभाग घ्यावयाचा नसल्यास त्यांनी त्याबाबतचे घोषणापत्र बॅंकेला देणे आवश्यक आहे. पीक विमा योजनेंतर्गत अकोला जिल्ह्यासाठी खरीप हंगाम २०२१ या वर्षासाठी एचडीएफसी ॲग्रो जनरल इन्श्युरन्स या कंपनीची नेमणूक करण्यात आली असून, पीक विमा काढण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १५ जुलैपर्यंत अर्ज दाखल करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कांतप्पा खोत यांनी केले आहे.
पीकनिहाय अशी आहे विमा
संरक्षित व हप्त्याची रक्कम!
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप ज्वारी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टर २५ हजार रुपये असून, शेतकऱ्यांना विमा हप्त्यापोटी ५०० रुपये रक्कम भरावी लागणार आहे. तसेच सोयाबीन पिकासाठी संरक्षित रक्कम ४५ हजार रुपये विमा हप्ता रक्कम ९०० रुपये, मूग पिकासाठी संरक्षित रक्कम १९ हजार रुपये व विमा हप्ता रक्कम ३८० रुपये, उडीद पिकासाठी संरक्षित रक्कम १९ हजार रुपये व विमा हप्ता रक्कम ३८० रुपये, तूर पिकासाठी संरक्षित रक्कम ३१ हजार ५०० रुपये व विमा हप्ता रक्कम ६३० रुपये आणि कापूस पिकासाठी संरक्षित रक्कम ४३ हजार रुपये व विमा हप्त्याची रक्कम २ हजार १५० रुपये भरावी लागणार आहे.