संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गतवर्षी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विकलेल्या शेतकर्यांसाठी प्रतिक्विंटल २00 रुपयांप्रमाणे मंजूर करण्यात आलेले अनुदान लाभार्थी शेतकर्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत वितरित करण्याचा निर्णय गत आठवड्यात घेण्यात आला; मात्र तीन दिवसांचा कालावधी उलटून गेला, तरी जिल्ह्यातील २२ हजार ९२७ शेतकर्यांना सोयाबीन अनुदान वाटपासाठी ७ कोटी ५६ लाख ४९ हजार सोयाबीन अनुदानाचा निधी अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे ‘डेडलाइन’ उलटून गेली असली, तरी सोयाबीनचे अनुदानाचा लाभ केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकर्यांना करावी लागत आहे. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर २0१६ या कालावधीत सोयाबीन विक्री केलेल्या शेतकर्यांसाठी प्रतिक्विंटल २00 रुपयांप्रमाणे जास्तीत जास्त २५ क्विंटल प्रती शेतकरीप्रमाणे १0८ कोटी ६४ लाख २९ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात येत असल्याचा निर्णय गत २६ ऑक्टोबर रोजी शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत घेण्यात आला. तसेच मंजूर करण्यात आलेल्या सोयाबीन अनुदानाचे वितरण लाभार्थी शेतकर्यांना ३१ ऑक्टोबरपूर्वी करण्याचा आदेशही शासन निर्णयानुसार देण्यात आला. परंतु ३१ ऑक्टोबरची मुदत उलटून तीन दिवसांचा कालावधी होत आहे; मात्र जिल्हय़ातील सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विकलेल्या २२ हजार ९२७ पात्र लाभार्थी शेतकर्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या ७ कोटी ५६ लाख ४९ हजार २७४ रुपयांचा निधी ३ नोव्हेंबरपर्यंत प्राप्त झाला नाही. निधी उपलब्ध झाला नसल्याने, जिल्ह्यातील शेतकर्यांना सोयाबीन अनुदान वाटपाची प्रक्रिया अद्याप सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे मंजूर सोयाबीन अनुदान रकमेचा प्रत्यक्ष लाभ मिळणार तरी केव्हा, याबाबत जिल्ह्यातील शेतकर्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
अनुदानाची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा केव्हा होणार?शेतकर्यांना सोयाबीन अनुदान वितरित करण्यासाठी शासनामार्फत रक्कम मंजूर करण्यात आली; मात्र मंजूर अनुदानाचा निधी अद्याप प्राप्त झाला नाही. त्यामुळे सोयाबीन अनुदानाची रक्कम प्रत्यक्ष शेतकर्यांच्या बँक खात्यात केव्हा जमा होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे.
शासन निर्णयानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन विकलेल्या जिल्ह्यातील २२ हजार शेतकर्यांसाठी ७ कोटी ५६ लाख ४९ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. अनुदानाची रक्कम प्राप्त होताच संबंधित शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे.-जी.जी. मावळे, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)