अकोला: शिक्षण संस्थेतील अंतर्गत वादातून निलंबित शिक्षकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी जवाहर नगरातील हनुमान मंदिराजवळ घडली. हल्ल्यात शिक्षक गंभीर जखमी झाला असून, हल्लेखोर फरार झाले. या प्रकरणात सिव्हिल लाइन पोलिसांनी संदीप पाटील, गोपाल इंगळे यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला.सहकार नगरातील एस. आर. पाटील विद्यालयामध्ये संस्थेचे संचालक आणि काही शिक्षकांमध्ये वाद सुरू आहेत. या वादातूनच शिक्षक भरत राणे यांना संस्थेने निलंबित केले होते. दरम्यान, त्यांच्यावर मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणात खदान पोलिसांनी गुन्हासुद्धा दाखल केला होता. संस्थेमधील अंतर्गत वादातूनच त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप राणे यांच्या पत्नीने केला आहे. शुक्रवारी भरत राणे (५७ रा. द्वारकाप्रसाद नगर) हे जवाहर नगरातून जात असताना तोंडाला कापड बांधलेले अनोळखी चार ते पाच जण आले आणि त्यांनी राणे यांच्यावर लोखंडी पाइपने हल्ला चढवित त्यांना मारहाण केली आणि हल्लेखोर पळून गेले. शिक्षक राणे रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना काही नागरिकांनी आॅटोरिक्षामध्ये घालून सर्वोपचार रुग्णालयात भरती केले; परंतु त्यांच्या डोक्याला व हाता-पायाला जबर मार लागल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. सिव्हिल लाइन पोलिसांनी चौघांविरुद्ध भादंवि कलम ३२६ नुसार गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)राणे यांच्यावरही मारहाणीचा गुन्हा दाखलया संस्थेतील संचालक संदीप पाटील यांना मारहाण केल्या प्रकरणात निलंबित शिक्षक भरत राणे यांच्यावर आठ दिवसांपूर्वी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. संदीप पाटील यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.संस्थेतील तिघांवर संशयसंदीप पाटील यांना मारहाण केल्याच्या वादातून शुक्रवारी अनोळखी काही युवकांनी शिक्षक भरत राणे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. शाळेतील संदीप पाटील, प्राचार्य गोपाल इंगळे व दीपक गोपनारायण यांनी हा हल्ला केल्याचा आरोप भरण राणे यांच्या पत्नीने पोलीस तक्रारीत केला आहे.