खामगाव (जि. बुलडाणा) : शेतातील विद्युत खांबाला स्पर्श झाल्याने देविदास नारायण उमाळे (५२) या शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम वडशिंगी येथे गुरुवारी घडली, तर बंद झालेला विद्युत पुरवठा सुरू करताना विजेच्या धक्क्याने शेगाव येथील प्रशांत पवार (३४) या लाइनमनचा मृत्यू झाला.गुरुवारी सकाळी शेतात काम आटोपून मोटारपंप बंद करतेवेळी देविदास उमाळे यांचा विजेच्या ताराला स्पर्श झाला. यावेळी शेतातच काम करीत असलेला त्यांचा धाकटा भाऊ किसन उमाळे व पुतण्या अंकित यांनी धाव घेत काठीच्या सहाय्याने त्यांना तारांपासून वेगळे केले आणि तात्काळ जळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुसर्या एका घटनेत शेगाव परिसरात बुधवारी रात्री वार्यासह जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेक भागांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, महावितरणचे लाइनमन प्रशांत गोकूल पवार (३४) यांच्यासह आणखी तिघे विद्युत वाहिनीवर काम करीत असताना तारांमध्ये अचानक वीज प्रवाह सुरू झाला. लाइनमन पवार यांना विजेचा जोरदार धक्का बसला व त्यामुळे ते खांबावरून खाली कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला. पवार यांना स्थानिक सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू
By admin | Published: June 23, 2016 10:32 PM