व्याळा: येथे अज्ञात आजाराने गुरांचा मृत्यू होत असल्याने पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, गावातील गुरांना पशु वैद्यकीय रुग्णालयातर्फे गत महिन्यात खुरी आजाराची लस टोचण्यात आली होती. ही लस बोगस असून, या लसीमुळे इतर आजार झाल्यानेच गुरांचा मृत्यू होत असल्याचा आरोप पशुपालकांनी केला आहे. शुक्रवारी दोन गुरांचा मृत्यू झाल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे.
गुरांंना खुरीचा आजार बळावला असताना शासकीय पशु वैद्यकीय रुग्णालयामार्फत प्रतिबंधक लस देण्यात आली. येथील शासकीय पशु रुग्णालयात अनेक प्रकारचे औषधी उपलब्ध नसल्याने पशुपालकांना खासगी रुग्णालयातून औषध घेऊन उपचार करावे लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पशुपालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गत महिन्यात पशु वैद्यकीय रुग्णालयामार्फत दिलेली लस प्रभावी ठरली नसून, लस दिल्यामुळे गुरांना अनेक आजार झाल्याचा आरोप पशुपालकांमार्फत होत आहे. दरम्यान, अज्ञात आजाराने गुरांचा मृत्यू होत असून, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन चौकशी करण्याची मागणी प्रदीप गिर्हे, उज्ज्वल अंभोरे, गोपाल वाकोडे, मोहन गावंडे, हरिहर म्हैसने यांनी केली आहे.
---------------------------------------------
मृत्यू झालेल्या गुरे व आजारी असलेल्या गुरांचे रक्त व लाळ यांचे नमुने तपासणीसाठी पाठविणार आहे. रुग्णालयात ज्या औषधी उपलब्ध आहेत. त्त्या रुग्णालयातून दिल्या जाणार आहेत. पशुपालकांनी संपर्क साधावा.
डॉ. शेख, पशु वैद्यकीय अधिकारी, व्याळा.
--------------------------------------------------------
शासकीय पशु वैद्यकीय रुग्णालयामार्फत गुरांना दिलेली लस प्रभावी नाही. या लसीची चौकशी करावी. गावात अज्ञात आजाराने गुरांना ग्रासलेले असताना शासकीय यंत्रणेने दुर्लक्ष होत आहे.
-प्रदीप गिर्हे, तालुका अध्यक्ष, गुरुदेव सेवा मंडळ.