लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सवरेपचार रुग्णालयातील बालरोग विभागात उपचारार्थ दाखल असलेल्या बालिकेचा मृत्यू झाल्यामुळे क्रोधित झालेल्या नातेवाईकांनी उपचारात हलगर्जी केल्याचा आरोप करीत, कर्तव्यावर असलेल्या परिसेवकास मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात न आल्यामुळे हे प्रकरण आपसात मिटल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.वाशिम जिल्हय़ातील मालेगाव तालुक्यातील राजश्री वाघमारे या तीन वर्षीय बालिकेस तीन दिवसांपूर्वी ताप आल्यामुळे सवरेपचार रुग्णालयातील बालरोग विभागाच्या वार्ड क्र. २३ मध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवारी या बालिकेची तब्येत बिघडली व दुपारच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. मुलीचा मृत्यू झाल्यामुळे चिडलेल्या नातेवाईकांनी परिसेवक गायकवाड यांना मारहाण केली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर व परिसेवकांनी आपल्या मुलीकडे लक्ष न दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर परिसेवक गायकवाड यांनी प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांच्याकडे तक्रार करून या प्रकाराची माहिती दिली.
अधिष्ठातांनी दिला चौकशीचा आदेशबालरोग विभागातील वार्ड क्र. २३ मध्ये उपचारार्थ भरती असलेल्या बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी परिसेवकास केलेल्या मारहाण प्रकरणाची गंभीर दखल रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करून, अहवाल सादर करण्याचा आदेश प्रभारी अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी बालरोग विभागप्रमुख डॉ. विनीत वरठे यांना दिला आहे. चौकशी अहवालातून सत्य समोर येईल, असे डॉ. घोरपडे यांनी सांगितले.
राजश्री वाघमारे हिला उपचारासाठी आणले तेव्हा तिची प्रकृती गंभीर होती. शरीरात पाणी झाल्याने तिला श्वास घेणेही मुश्किल होत होते. तिच्यावर उपचार करण्यात कोणतीही हलगर्जी करण्यात आली नाही. दरम्यान, बुधवारी दुपारी तिचा मृत्यू झाला. - डॉ. विनीत वरठे, विभागप्रमुख, बालरोग विभाग.