रोशन पर्वतकर या युवकाने शासकीय यंत्रणेला हाताशी धरून अखेर पीपीई किट व साहित्याची जुळवाजुळव केली. अकोट शहरातील एका कुटुंबातील सर्वच सदस्यांचा अहवाल १८ एप्रिल रोजी कोरोना पाॅझिटिव्ह आला. घरातील कर्तापुरुष आजारी असल्याने त्यांना चाचणी करण्यासाठी रुग्णालयात घेऊन जाता आले नाही. या रुग्णांमध्ये कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसून येत होती. दरम्यान, या रुग्णाचा घरातच सकाळी मृत्यू झाला. या घटनेनंतर कोणीही मृतदेहाजवळ जात नव्हते. दरम्यान, याबाबतची माहिती शिवसेना शहर संघटक रोशन पर्वतकर यांना कुटुंबाने दिली. या मृत्यूबाबतची माहिती अकोला शल्य चिकित्सक, अकोट मुख्याधिकारी, अकोट शहर पोलीस निरीक्षक, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आली. बहुतांश मृत्यू अकोला येथे होत असल्याने त्याठिकाणी अंत्यसंस्कार होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी पीपीई किट व इतर साहित्यासह कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार करणारी यंत्रणा सज्ज नव्हती. ऐनवेळी जुळवाजुळव करीत साहित्य जमा केल्यानंतर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अकोट परिसरात मोठ्या प्रमाणात पाॅझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. अनेकांचे अहवाल येईपर्यंत रुग्ण घरात-घराबाहेर फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण वाढत आहे.
फोटो :