अकोला : पातूर तालुक्यातील रहिवासी एका इसमास मूळव्याधाचा त्रास असल्याने त्यांना शस्त्रक्रियेसाठी रामदासपेठमधील प्रताप हॉस्पिटलचा संचालक डॉ. अजयसिंह चव्हाण व त्यांच्या हॉस्पिटलमधील अमोल नामक युवकाने शस्त्रक्रिया करण्यापूर्वी बधिर करण्यासाठीचे इंजेक्शन चक्क सलाइनमधून दिल्यामुळे वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णाचा मुलगा व पत्नीने केला आहे. भूलतज्ज्ञ उपस्थित नसताना सलाइनमधून इंजेक्शन दिल्याने या रुग्णास रक्ताच्या उलट्या झाल्या व त्यानंतर काही तासांतच मृत्यू झाला.पातूर तालुक्यातील बोडखा येथील रहिवासी दशरथ वानखडे हे अकोल्यात चौकीदारीचे काम करतात. त्यांना मूळव्याधाचा त्रास असल्याने ते २८ आॅक्टोबर रोजी रामदासपेठमध्ये असलेल्या सिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले होते. येथील एका परिचारिकेने त्यांना डॉ. अजयसिंह चव्हाण यांच्या प्रताप हॉस्पिटलचे नाव सुचविले. यावरून वानखडे कुटुंबीय प्रताप हॉस्पिटलमध्ये गेले असता डॉ. अजयसिंह चव्हाण याने त्यांना दुसऱ्या दिवशी बोलावले. त्यानुसार दशरथ वानखडे त्यांचा मुलगा व पत्नी २९ आॅक्टोबर रोजी डॉ. अजयसिंह चव्हाण यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले. येथील परिचारिकेने त्यांना डॉक्टर शस्त्रक्रिया करीत असल्याचे सांगून दुपारी २ वाजतापर्यंत बसून ठेवले. त्यानंतर डॉक्टर आले असता त्यांनी गाठ झाल्याचे सांगून शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे वानखडे यांना सांगितले. त्यांनी शस्त्रक्रियेला होकार देताच दशरथ वानखडे यांना भरती करण्यात आले. ३० आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजता शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. तत्पूर्वी त्यांना तीन सलाइन देण्यात आले. दरम्यान, ३० आॅक्टोबर रोजी सकाळी एक सलाइन लावलेले असताना या हॉस्पिटलमधील अमोल नामक युवक सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी आला आणि त्याने दशरथ वानखडे यांचे कागदपत्र व कोणतीही फाइल न तपासता त्यांच्या सलाइनमध्ये बधिर करण्याचे इंजेक्शन दिले. या इंजेक्शनमुळे काही वेळातच दशरथ वानखडे यांच्या हृदयाचे ठोके बंद पडले व रक्ताच्या उलट्या झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकारामुळे वानखडे यांचा मुलगा व पत्नी प्रचंड घाबरल्याने त्यांना डॉ. चव्हाण याने सिटी हॉस्पिटलमध्ये हलविण्याचे सांगितले. दशरथ वानखडे यांना सिटी हॉस्पिटलमध्ये हलविताच त्यांचा काही तासांतच मृत्यू झाला. डॉ. अजयसिंह चव्हाण व अमोल नामक युवक या दोघांची निष्काळजी आणि बधिरीकरणाचे इंजेक्शन सलाइनमधून दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची तक्रार आकाश वानखडे यांनी रामदासपेठ पोलीस ठाण्यात केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.