शहरातील मूलभूत साेयी सुविधांची पुरती वाट लागली आहे. शहराच्या कानाकाेपऱ्यात घाणीने तुडूंब साचलेल्या नाले, गटारे, धुळीने माखलेले रस्ते, ठिकठिकाणी साचलेला कचरा असे चित्र अकाेलेकरांसाठी किळसवाणे ठरत आहे. प्रभागांमध्ये तुंबलेल्या सांडपाण्याची समस्या निकाली काढली जात नसल्याने मनपातील स्वच्छता व आराेग्य विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्हं उपस्थित झाले आहेत. अशा परिस्थितीत अज्ञात साथराेगामुळे शहराच्या विविध भागात डुकरांचे मृत्यू हाेत असल्याचे समाेर आले आहे. याची सुरुवात दक्षिण झाेनमधील प्रभाग क्रमांक १९ मध्ये झाली हाेती. दीड महिन्यापूर्वी प्रभाग १९ मध्ये सहा ते सात दिवसांच्या कालावधीत सुमारे २९ डुकरांचा मृत्यू झाला हाेता. त्यानंतर प्रभाग क्रमांक १, ८, ९, १६, १७, १८ व आता प्रभाग १० मध्ये डुकरांची कलेवरे आढळून आली आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. खुल्या जागा, तुंबलेल्या सांडपाण्यात वराह मृतावस्थेत आढळून येत असून त्यांची नगरसेवक किंवा सामाजिक संघटनांकडून परस्पर विल्हेवाट लावली जात आहे.
डुकरांच्या मृत्यूचे गूढ कायम
काही दिवसांपूर्वी पक्षांमधील ‘बर्ड फ्लू’च्या साथीने हाहाकार उडाला हाेता. आता डुकरांचे मृत्यू हाेत असल्यामुळे अकाेलेकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अचानक इतक्या माेठ्या संख्येने डुकरांचा मृत्यू का हाेत आहे, याचा महापालिका प्रशासनाने शाेध घेणे क्रमप्राप्त असताना प्रशासनाकडून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न हाेत आहे. यामुळे डुकरांच्या मृत्यूचे गुढ कायम आहे.
जबाबदारी काेणाची; अकाेलेकरांचा वाली काेण?
काेराेनाच्या साथीची धास्ती कायम असतानाच शहरात डुकरांचे मृत्यू हाेत आहेत. याबाबत स्वच्छता व आराेग्य विभागासह काेंडवाडा विभागाकडून जबाबदारी झटकली जात असल्याने ही जबाबदारी काेणाची याचा खुलासा मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी करण्याची गरज आहे. मनपाकडून कर्तव्याकडे पाठ फिरवली जात असेल तर अकाेलेकरांचा वाली काेण, असा सवाल उपस्थित झाला आहे.